उमरगा (प्रतिनिधी) -उमरगा तालुक्यातील जकेकुर शिवारातील चौरस्ता भागात चौधरी कॉलनीतील एका घराच्या दुसऱ्या मजल्यावर तिर्रट नावाचा जुगार खेळला जात असल्याचे गुप्त माहितीवरून धाराशिव पोलिस पथकाने शनिवारी रात्री 10 च्या सुमारास धाड टाकून जवळपास सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन पोलीसासह 16 जणावर उमरगा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, धाराशिव पोलिस अधिक्षक कार्यालयास मिळालेल्या गोपीनिय माहितीच्या आधारे जकेकुर शिवारातील चौधरी कॉलनी मधील एका घराचे वरच्या मजल्यावरील खोलीत कांहीजण तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याची खबर मिळाली. याबाबत पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कावत, सहाय्यक पोलीस निरीक्षक तिगाटे व पोलिस कर्मचारी यांच्या पथकाने उमरगा पोलिसांना सोबत घेऊन सदरील ठिकाणी शनिवारी (दि.23) धाड टाकली असता  16 लोक तिरट जुगार खेळत असताना पथकास मिळुन आले. नमूद जुगार अड्ड्यावरुन तिरट जुगाराचे  साहित्यासह 12 मोबाईल फोन, 3 मोटरसायकल व रोख रक्कम असा एकुण 2,28,355 रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला असुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 4,5 अंतर्गत उमरगा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षीक नवनीत कॉवत यांच्या आदेशावरुन उमरगा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पारेकर, सपोनि भराटे, पोलीस नियंत्रण कक्षाचे सपोनि तिगोटे, पोलीस नियंत्रण कक्ष व उमरगा पोलीस ठाणेचे अंमलदार यांच्या पथकाने केली आहे.


 
Top