धाराशिव (प्रतिनिधी) - राज्यातील शाहू फुले आंबेडकर निवासी आश्रम शाळांना 100 टक्के अनुदान व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमित वेतन श्रेणीनुसार वेतन वितरित करण्याच्या मागणीसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कसबे तडवळा येथील कळंब रोडवर आमरण उपोषण सुरू केले असून आजचा तिसरा दिवस आहे.

राज्यात 2003 पासून 165 शाहू फुले आंबेडकर निवासी आश्रम शाळा आहेत. या शाळेंना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रिट पिटीशन क्र.956/2003 प्रमाणे 28 फेब्रुवारी 2003 च्या न्यायालयीन आदेशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने या शाळांना दि. 18 फेब्रुवारी 2006 रोजी शासन निर्णय क्र.सीएएस 2005/प्र क्र.459/मावक/4 शाळेंना कायम विना अनुदानीत या तत्त्वावर मान्यता दिली. मात्र अद्यापपर्यंत या शाळांना अनुदान दिलेले नाही. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपासमार सुरू असून त्यांचा प्रश्न तात्काळ सोडवावा आदींसह इतर विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. यामध्ये महबूब शेख, अनिल हजारे, शंकर पुरी, लक्ष्मण कानगे, नदीम शेख, बाबासाहेब भालेराव, अर्जुन कातकडे, विलास पवार, नागनाथ पवार, दिलीप वाघ, अमोल नागरगोजे, किशोर मगर, बालाजी कस्पटे, शशिकांत कोकाटे, तोफिक शेख, प्रदीप पांढरे, चारुशीला जाधव आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.


 
Top