तुळजापूर (प्रतिनिधी) - तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे बुधवार दि १५ ऑगस्ट पासून नागनाथ महाराज यात्रेस अमावस्येदिनी नागनाथ महाराज मुर्तीस रुद्र , अभिषेक , पंचआरतीसह ,मानकऱ्यांच्या हस्ते मुख्यपुजारी कल्याण स्वामी महाराज यांना कंकण बांधून ,व नाग, पाल, विंचू , यांच्या आगमनाने प्रारंभ झाला
याठिकाणी एकमेकांचे शत्रू समजले जाणारे नाग पाल विंचू-हे उभयचर जिव श्री नागनाथ महाराजांच्या मंदिराशेजारील एका शिळेखाली अमावस्यापासुन एकत्रित वास्तव्य करतात त्या निमित्ताने नागपंचमी दिवशी सावरगाव येथे मोठी यात्रा भरते,
या पाच दिवसांत घरांत भाजी चिरण्यासाठी विळी तसेच, बळीराजा शेतात नांगरणी , पेरणी न करता जुन्या रुढीपरंपरा पाळतो.
ही आगळी-वेगळी प्रथा सुमारे दोनशे वर्षांपासून पाळली जात असल्याचे याठिकाणच्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे, नाग , पाल, विंचू , एकत्रित येण्यामागे आख्यायिका सांगितली जाते. सावरगावचे नाव खूप वर्षांपूर्वी नागापूर असे होते. याठिकाणच्या महादेव मंदिरात रोज येत असलेल्या एका नागदेवता मुळे या गावचे नाव नागापूर असे पडले होते. या ठिकाणी एक गरीब ब्राह्मण कुटुंब राहत होते. त्यामधील घरचा प्रमुख असलेला ब्राह्मण या महादेवाची अखंड सेवा पुजारी म्हणून करीत होता. दररोज पंचामृताने अभिषेक करीत असलेल्या त्या पुजाऱ्याच्या तपश्चर्येमुळे एके दिवशी चमत्कार घडला. नेहमी येणाऱ्या नागदेवताने महादेवाच्या पिंडीजवळ नागमणी ठेवला,तो नागमणी या पुजाऱ्याला सापडला. त्यामुळे तो आनंदी झाला, हा प्रकार एके दिवशी नव्हे, तर दररोजच घडू लागला. यामुळे पुजाऱ्याला दररोज एक नागमणी मिळू लागला. पुजारी असलेला ब्राह्मण हा नागमणी घरी नेवून एका गाडग्यात जतन करून ठेवू लागला,
एके दिवशी हा प्रकार या पुजाऱ्याने घरातील पत्नी मुलगा व सुनेला सांगितला. त्यामुळे या प्रकारामुळे हे दोघे आश्चर्यचकित झाले. त्यांनाही हा भुजंग नाग देत असलेल्या नागमणीबद्दल कुतहूल वाटू लागले, त्यातच या पुजाऱ्याने एके दिवशी पत्नीसह चारधाम यात्रेवर जाण्याचे ठरविले. या पुजाऱ्याने चारधाम यात्रेला जाण्यापूर्वी मंदिरातील महादेवाची पूजा कशी करायची व नागमणी केव्हा मिळतो याची कल्पना त्याच्या मुलाला दिली. त्यानंतर तो तीर्थयात्रेला पत्नीसोबत निघून गेला. वडील काशीला गेल्यानंतर त्याचा मुलगा महादेवाची पूजा करू लागला. त्यालाही दररोज नागमणी मिळू लागला.
मात्र, मंदिरात सेवा करीत असल्यामुळे त्यांचा जास्त वेळ पूजा अर्चेतच जाऊ लागला. त्यांच्याकडे उत्पन्नाचे दुसरे सधान नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीचे संकट कोसळले, त्यावेळी त्याच्या बायकोने नागाची सेवा करायची सोडण्याचे वचन त्याच्याकडून घेतले, या नवरा व बायकोने मिळून या नागाकडील सर्व नागमणी एकदाच मिळवण्याच्या लालचेने नागालाच मारायचे ठरविले. एके दिवशी त्या मुलाने त्या ठिकाणी नागमणी सोडण्यासाठी येत असलेल्या नागाच्या डोक्यात दगडी चिरा घालून मारले. या घटनेनंतर तो पुजारी काशीमध्ये मंदिराच्या पायरी चढत असताना त्याला ही घटना समजली. त्यानंतर या पुजाऱ्याने मुलाच्या हातून चूक घडल्याने त्या ठिकाणीच अन्न पाणी न घेता देवाची तपश्चर्या सुरू केली. मात्र, देव काही लवकर प्रसन्न झाला नाही. या तपश्चर्येत कित्येक वर्ष लोटल्यानंतर देव प्रसन्न झाला. यावेळी पुजाऱ्याने झालेली चूक कबूल केली अन देवाकडे एक वर मागितला. पुजारी व त्याची पत्नी व मुलाला वर्षातून एकदा एकत्र भेटण्याची इच्छा त्याने देवाकडे व्यक्त केली. देवानेही ही त्याची इच्छा मान्य केली. त्यामुळे एकत्र भेटायचे म्हणून हे तिघे जण वर्षांतून पाच दिवस नागनाथ मंदिराच्या समोर असलेल्या एकाच शिळेखाली एकत्र येतात, नाग हा पुजारी आहे तर पाल म्हणजे त्याची पत्नी आहे तर विंचू म्हणजे मुलगा असल्याचे येथील नागरिक सांगतात.
नागपंचमीनिमित्त सावरगावात भरणाऱ्या श्री नागनाथ महाराजांच्या यात्रेसाठी परिसरातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. पंचमीच्या अगोदर आषाढी अमवस्येला हे तीन जीव एकत्र येतात. त्यानंतर पाच दिवस म्हणजे पंचमीपर्यंत हे तीन जीव एकत्र असतात सोमवार दि,21 ऑगस्ट रोजी पंचमी दिवशी गावात मोठी यात्रा भरते, गावातील प्रमुख मार्गावरून श्री, नागनाथ महाराज पालखी ,खरगा गण तथा मुख्यपुजारी श्री कल्याण महाराज यांची भव्य मिरवणूक होवुन मंदिरपरिसरात सायं ६ वाजता भाकनूक होवुन यात्रेची सांगता होते या यात्रेसाठी परिसरातील भक्तगण मोठया संख्येने सहभागी होतात.