धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पोलिस अधिक्षक कार्यालय आणि वाशी तालुका विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आदिवासी दिना निमित्त कायदेविषयक जनजागृती, आरोग्य तपासणी, शासकीय योजनांचे लाभ व त्याचे प्रत्यक्ष वाटप शिबीर याचे आयोजन वाशी तालुक्यातील  तेरखेडा येथील सुहासिनी मंगल कार्यालयात उत्साहाच्या वातावरणात आयोजित करण्यात आला. यावेळी तेरखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, येथे प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा अंजू एस. शेंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्षा अंजू एस. शेंडे ह्या अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून भूमचे जिल्हा न्यायाधीश-1 एस.आर. उगले, जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक नवनीत कॉंवत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (प्र.) प्रांजल शिंदे, वाशीचे गटविकास अधिकारी एन. पी. राजगुरु, वाशीचे तहसीलदार नरसिंग जाधव, येरमाळाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल पाटील आणि वाशी विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष आर. एन. पवार आदी उपस्थित होते.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव वसंत यादव यांनी आजच्या आदिवासी दिनानिमित्त कायदेविषयक जनजागृती शिबीराची प्रस्तावना केली.  श्रीमती शेंडे यांनी आदिवासी समाजाचा विकास करण्यासाठी आदिवासी समाजातील तरुण मुला-मुलींना शिक्षण देणे ही मुलभूत गरज आहे, या विषयावर मार्गदर्शन केले. या शिबीरामध्ये धाराशिव शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय येथील डॉक्टरांनी गरजूंना वैद्यकीय उपचार करुन औषधांचे वाटप केले. या कार्यक्रमासाठी वाशीच्या तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्षा जे. एस. गायकवाड यांचे विशेष सहकार्य लाभले.


 
Top