धाराशिव (प्रतिनिधी)-शहरात परम पूजनीय रंगनाथ सेलूकर यांच्या कृपाशीर्वादाने गवामयन सत्र सोमयाजी दीक्षित सेलूकर महाराज यांच्या उपस्थितीत यज्ञ मार्तंड दीक्षित श्री यज्ञेश्वर महाराज सेलुकर कृत श्रावण मास शिवपूजन 17 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर योजनेअंतर्गत 2023 या कालावधीत शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय ,समर्थ नगर येथे आयोजित करण्यात आले आहे. या 30 दिवसीय शिवपूजन उपक्रमामध्ये व्याख्यान, कथा ,कीर्तन ,भजन इत्यादी कार्यक्रम होणार आहेत. यात सहभागी व्हावं असं आवाहन शिवपूजन सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
श्रावण मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या शिवपूजन मास कार्यक्रमात दररोज सकाळच्या प्रहरामध्ये पाटावरती पार्थिव शिवलिंग तयार करून त्याची पूजा केली जाणार आहे.मागील तीन पिढ्यांपासून सेलूकर घराण्यामध्ये हे शिवपूजन कार्यरत आहे.
याची सुरुवात 17 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता शोभायात्रेने होणार असून पार्थिव लिंगार्चन कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर शिवमहिम्नस्तोत्र संथा देणे, धर्मराजा आणि यक्ष यांचा संवाद यावर हभप. अनिरुद्ध जोशी सोलापूर यांचे प्रवचन होणार आहे. 23 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट दरम्यान हभप. डॉ. ना. पा. देशपांडे यांचे निजानंद रंगनाथ स्वामी चरित्र या विषयावर प्रवचन होत असून 27 ऑगस्ट रोजी एकादशीनिमित्त गीता पाठ रामकृष्ण मंडळ धाराशिव यांच्याकडून होणार आहे. 30 ऑगस्ट रोजी श्रावणी चा कार्यक्रम तर 1 सप्टेंबर रोजी भीष्म स्तुती या विषयावर भागवताचार्य ऋषिकेश जोशी यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. एक सप्टेंबर रोजी दुपारी रामचरितमानस यावर महिला मंडळ समर्थ नगर धाराशिव सुंदर कांड या विषयावर प्रवचन सादर करणार आहेत. तीन सप्टेंबर रोजी दुर्गा सप्तशती वाचन तर 4 सप्टेंबर रोजी रामरक्षा अध्यात्मिक व वैज्ञानिक दृष्टिकोन आणि उपयोगिता या विषयावर ह भ प अविनाशजी थिगळे महाराज व्याख्याने होणार आहेत.सात सप्टेंबर ते 13 सप्टेंबर दरम्यान नारद भक्तिसूत्र चिंतन यावर हभप पद्मनाभ व्यास महाराज दुपारी बारा ते तीन या वेळेत प्रवचन सांगणार आहेत तर दहा सप्टेंबर रोजी रामकृष्ण मंडळ गीता पाठ घेणार आहे.
या शिवलिंग निर्माण आणि शिवपुजन सेवेसाठी नागरिकांनी सहभागी व्हावं असा आवाहन शिवपूजन सेवा समिती धाराशिव चे रंगनाथ धोंडोपंत कुलकर्णी, भारत मसलेकर ,नंदकिशोर ठाकरे आणि उल्हास शहापुरे यांनी केल आहे.