धाराशिव  (प्रतिनिधी) -शेतीमध्ये सातत्याने रासायनिक कीटकनाशकांचा वापर होत आहे. अधिकच्या वापरामुळे जमिनीचा पोत खालावत चालला आहे.रासायनिक  कीटनाशकांच्या फवारणीचे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. याला सेंद्रीय शेतीच उत्तम पर्याय असल्याचे मत सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रा. डॉ.तानजी सावंत यांनी व्यक्त केले. 

 धाराशिव तालुक्यातील मौजे अनसुरडा येथील सेंद्रिय शेती करणाऱ्या 5 महिलांना ऑरगॅनिक पासपोर्टचे वितरण पालकमंत्र्यांच्या हस्ते एका आयोजित कार्यक्रमात करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे ,जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सहाय्यक जिल्हाधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रांजल शिंदे,अपर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे,निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, उपविभागीय अधिकारी डॉ.योगेश खरमाटे,उपजिल्हाधिकारी संतोष भोर, राजकुमार माने , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने व जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा.डॉ.सावंत पुढे म्हणाले की,सन 2023-24 मध्ये जिल्ह्यातील 5 हजार सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना ऑरगॅनिक पासपोर्ट देण्याचे नियोजन आहे.अन्नधान्याच्या आणि संकरित वाणाच्या तसेच इतर पिकांच्या अधिक उत्पादनासाठी रासायनिक खते,किटकनाशके, बुरशीनाशके आणि तणनाशकाचा मोठ्या प्रमाणात असंतुलीत वापर होत आहे.पाण्याचा जास्त वापर, जमिनीची धूप,सेंद्रिय खतांचा कमी वापर अथवा अजिबात वापर न करणे,एकच पीक वारंवार घेणे इत्यादी कारणांमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडून जमिनीतील जैविक घटकाचा विनाश झाल्याने जमिनी मृत होत चालल्या असून कडक होत असल्याचे त्यांनी सांगितले.

जमिनीचा पोत बिघडून जमीन नापीक होत असल्याचे सांगून पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत म्हणाले की, पिकांची उत्पादकता कमी होणे, उत्पादित शेतमालाची प्रत खालावणे, मशागतीचा खर्च वाढणे,रासायनिक निविष्ठांच्या खरेदीमुळे उत्पादन खर्च वाढणे इत्यादी दुष्परिणाम दिसून येत आहे.परिणामस्वरूप मानवी व पशुपक्षी यांच्या आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होऊन पर्यावरणासह जैवविविधतेस धोका निर्माण होत आहे.मानवी शरीराची प्रतीकारशक्ती वाढविण्यासाठी उच्च दर्जाची सकस आणि विषमुक्त फळे, भाजीपाला आणि अन्नधान्य मागणीमध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे नैसर्गिक व सेंद्रिय  शेतीचे महत्व अधोरेखित झालेले आहे,वरील दुष्परिणाम लक्षात घेता जिल्ह्यात नैसर्गिक व सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देणे ही काळाची गरज झालेली आहे.असेही पालकमंत्री डॉ.सावंत यावेळी म्हणाले.

यावेळी पालकमंत्र्यांना या उपक्रमाबाबत माहिती देताना जिल्हाधिकारी डॉ. ओमबासे म्हणाले की, उस्मानाबाद जिल्हयामध्ये परंपरागत कृषी विकास योजने अंतर्गत १०४० हेक्टर क्षेत्रावर ५२ शेतकरी गटामधील २२९३ शेतकरी सेंद्रिय शेती करीत आहे. सन २०२३-२४ मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत ५५०० हेक्टर क्षेत्रावर ११० गट होणार असून त्यांच्या ११ शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन होणार आहेत.उस्मानाबादसाठी जिल्हा सेंद्रिय समिती तयार करण्यात आलेली आहे.त्यामुळे पोलीस अधीक्षक,उस्मानाबाद यांनी जिल्ह्यातील सेंद्रिय शेती करणारी शेतकरी,शेतकरी गट,शेतकरी कंपनी, सेवाभावी संस्था यांचा एक व्हाट्सअँप ग्रुप तयार केला.पोलीस अधीक्षक कार्यालयात सर्वांची बैठक घेऊन सर्वानी आपापल्या शेतात केलेले प्रयोग शेअर केले.प्रत्येक तालुक्यात सेंद्रिय शेती जनजागृती बाबत कार्यशाळा आयोजित केली. तसेच सेंद्रिय शेतीमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांना जागा उपलब्ध करून दिली.त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालय यांना जिल्ह्यातील कृषी क्षेत्राच्या विकासाबाबत तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एकात्मिक डॅशबोर्ड तयार करण्याची नितांत गरज भासली.सध्या सेंद्रिय शेती आणि सेंद्रिय अन्न क्षेत्रातील अन्न फसवणुकीमुळे, 'ऑरगॅनिक' हा शब्द ग्राहकांच्या मनात  वाईट संभ्रम स्थितीत आहे, त्यांना सेंद्रीय अन्न आणि उत्पादने खरेदी करणेसाठी आवश्यक  विश्वास नाही.त्यामुळे ऑरगॅनिक पासपोर्ट अभियानाद्वारे ही अतिरिक्त हमी ग्राहक आणि ग्राहकांचा आत्मविश्वास वाढवेल. पोलिस आणि FSSAI द्वारे समर्थित तक्रार निवारण यंत्रणेमुळे ते अधिक खरेदी करतील. 

धाराशिव जिल्ह्यात सेंद्रिय शेती आणि वृक्षारोपणाचे दुत म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची ख्याती आहे. त्यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात येत आहे असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.माने यावेळी म्हणाले, सामाजिक आर्थिक विकास निर्देशांक आणि त्यांच्या समुदाय,ब्रँड यांच्यातील प्रतिष्ठा वाढविण्याबरोबरच आर्थिक आवक/उत्पन्नाचे पर्याय वाढविण्यासाठी QR कोड मिळविण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये चांगली सृदृढ स्पर्धा निर्माण होईल,या ऑरगॅनिक पासपोर्टमुळे कर्ज देणाऱ्या संस्थांसोबत शेतकऱ्यांची पत वाढवण्यास मदत होईल,त्याने कोणतेही कर्ज घेण्यापूर्वी ऑरगॅनिक पासपोर्ट तर हे शेतकऱ्यांचे खरे क्रेडिट कार्ड असेल. अशी माहितीही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री माने यांनी यावेळी पालकमंत्र्यांना दिली.

 
Top