धाराशिव ( प्रतिनिधी) - कळंब शहर हे जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे.या ठिकाणी सर्व पायाभूत आणि आवश्यक सुविधा उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे या शहराच्या विकासासाठी पुढील 50 वर्षांचे नियोजन समोर ठेवून यंत्रणांनी निधीची मागणी करावी.असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तथा पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी दिले.
कळंब नगरपरिषद सभागृहात 15 ऑगस्ट रोजी आयोजित कळंब नगर परिषदेच्या प्रलंबित विकास कामाचा आढावा आयोजित बैठकीत पालकमंत्री प्रा.डॉ. सावंत यांनी घेतला. सभेला नगर पालिका प्रशासन अधिकारी श्री۔जाधवर,मुख्याधिकारी शैला डाके तसेच जिल्ह्यातील संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.
।यावेळी नगरपरिषद शाळांच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देणे, शहरात मल्टीपर्पज हॉल व नाट्यगृह इमारतीमधील अंतर्गत सजावट व पार्किंग व्यवस्था विकसित करणे,महिला बालोद्यान विकसित करणे, ईदगाह मैदानासाठी जागा उपलब्ध करून देणे तसेच कळंब शहरासाठी वाढीव पाणीपुरवठा योजना विकसित करणे, घनकचरा व्यवस्थापनासाठी शासकीय गायरान जमीन उपलब्ध करून देणे व इतर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आढावा सभेत चर्चा करण्यात आली.