धाराशिव (प्रतिनिधी) - देशात युवावर्ग आणि विद्यार्थ्यांचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या 60 टक्के आहे. यामध्ये नवमतदारांची संख्याही तेवढीच असणे अपेक्षित आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची नवमतदार म्हणून नावनोंदणी करण्यासाठी महाविद्यालयांची भूमिका महत्वाची आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले.  

डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या उपकेंद्रात नवमतदारांचे मतदार नोंदणी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या आयोजित सभेत  ओम्बासे बोलत होते.

यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) शिरीष यादव, उपविभागीय अधिकारी डॉ.योगेश खरमाटे, तहसिलदार डॉ.शिवानंद बिडवे, अधिसभा सदस्य डॉ.संजय कोरेकर, देविदास पाठक, प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख, उपकेंद्राचे संचालक डॉ. प्रशांत दिक्षीत, व्यवस्थापनशास्त्र विभागाचे संचालक डॉ.सुयोग अमृतराव, कौशल्य विकासचे रोजगार मार्गदर्शन अधिकारी महम्मद रिजवान कपूर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी ओम्बासे पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी महाविद्यालयांनी योगदान देणे आवश्यक आहे. त्यामुळे प्राचार्यांनी यासाठी विशेष शिबीरे घेऊन विद्यार्थ्यांची मतदार म्हणून नाव नोंदणी करुन घ्यावी. यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि तहसील कार्यालयाचीही मदत घ्यावी. आज प्रत्येक विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन आहे. त्यामध्ये वोटर रजिस्ट्रेशन ॲप डाऊनलोड करुन विद्यार्थी आपली मतदार नोंदणी करु शकतात असे सांगितले. 

100 टक्के नवमतदार नोंदणी करण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाने विद्यार्थ्यांकडून अचूक माहिती भरुन घेणे आवश्यक आहे. आधारकार्डनुसार पत्ता आणि जन्मतारीख यादीमध्ये भरणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी  कार्यालयाकडून  उपलब्ध करुन देण्यात आलेल्या विहीत नमुन्यात विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती भरावी. या माहितीसोबत विद्यार्थ्यांचे (ईपिक) रजिस्ट्रेशन असणेही महत्वाचे असल्याचे ओम्बासे यावेळी म्हणाले. 

2023-24 हे वर्ष निवडणूकांचे राहणार असल्याचे सांगून डॉ.ओम्बासे म्हणाले की, या कालावधीत लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद व नगर परिषद अशा वेगवेगळ्या निवडणूका होणार आहे. या निवडणूकांमध्ये सर्व मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, या हेतूने शासन आणि प्रशासनाकडून मतदार जनजागृती व नवमतदार नोंदणीची मोहिम हाती घेण्यात आली आहे. देशातील प्रत्येक नागरिकांनी लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करावे. कोणीही मतदार यादीत नाव नसल्याने मतदानापासून वंचित राहू नये यासाठी मतदार नोंदणी विशेष कार्यक्रम 1 जून 2023 पासून जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. साधारण 15 ऑक्टोबर 2023 पर्यंत मतदारांची अंतिम यादी प्रसिध्द करण्यात येईल, असेही डॉ. ओम्बासे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी उपजिल्हाधिकारी यादव म्हणाले की, जिल्ह्यात 1 हजार 503 मतदान केंद्र असून तितकेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बीएलओंच्या माध्यमातून 13 लाख 25 हजार मतदारांपैकी 8 लाख 50 हजार मतदारांच्या घरी जाऊन मतदार यादी अद्ययावत करण्यात आली आहे. हा कार्यक्रम 15 सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपकेंद्राचे संचालक डॉ. प्रशांत दिक्षीत यांनी केले. संचालन व उपस्थितांचे आभार डॉ.सुयोग अमृतराव यांनी मानले. कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील प्राचार्य आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top