धाराशिव  (प्रतिनिधी) - शेतकर्‍यांचे ऊसबिल, दुध दरवाढ, शेतीमालाचे भाव यासह अनेक प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. वर्षानुवर्षे रखडलेल्या शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर संसदेत आवाज उठविण्यासाठी माजीखासदार तथा संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभेची निवडणूक लढविणार असून महाराष्ट्रातील सहा जागांवर स्वाभिमानीचे उमेदवार असतील, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रा.बिभीषण भैरट, तानाजी पाटील, शहाजी समोसे, राजाभाऊ हाके, चंद्रकांत समुद्रे, शशी चव्हाण, तात्या रांजणीकर, गुरुदास भोजने, नेताजी जमदाडे यांची उपस्थिती होती.

जिल्हाध्यक्ष इंगळे म्हणाले की,  स्वाभिमानी शेतकरी संघटनेने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जनजागृती अभियानच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यात यात्रा काढली. यात्रेला शेतकर्‍यांमधून मोठा प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांना न्याय मिळवून दिला आहे.  सध्या शेतीसाठी लागणार्‍या खते, कीटकनाशकांवरील जीएसटीचा दर असेल अथवा इतर प्रश्नांवर शेतकरी संघटनेने वारंवार आवाज उठविला आहे. काही राजकीय नेत्यांनी पीकविमा मिळवून दिल्याचे होर्डिंग लावून श्रेय मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु शेतकर्‍यांच्या हक्काचा कारखाना, सुतगिरणी मोडीत निघाल्याचेही होर्डिंग का लावले जात नाहीत, असा सवालही त्यांनी केला.

शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील सहा जागांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार उभे करण्यात येणार असून लवकरच जागा जाहीर करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.
 
Top