धाराशिव (प्रतिनिधी) सामाजिक वनीकरण सह वन विभागाच्या माध्यमातून शासनाच्या तिजोरीवर कोट्यावधी रुपयाचा दरोडा टाकणार्या प्रकरणाची चौकशी जिल्हाधिकार्यांनी करावी अशी मागणी सेव्ह फार्मर्स विडोज फाउंडेशनच्या अध्यक्ष शीला उंबरे- पेंढारकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये नमूद केले आहे की, सामाजिक वनीकरण आणि वन विभागामार्फत दरवर्षी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम केला जातो. वृक्ष लागवडीनंतर देखभाल आणि निगा ठेवली जात नाही. छोट्या रोपांची लागवड करून त्याचा खरेदी दर जादा दाखवून आर्थिक लूट केली जाते. या देयकासाठी शासनाच्या तिजोरीवर अधिकारी संगणमताने दरोडा टाकण्याचे काम करतात. या संदर्भात शासकीय देयकांच्या तपासणीची आवश्यकता आहे. लागवड केलेल्या रोपांच्या वाढीसाठी पाण्याची सोय केली जात नसल्याने रोपे जळून जात आहेत.खाजगी रोपवाटिकेतून रोपांची खरेदी करून जादा रकमेची देयके मर्जीतील ठेकदाराशी संगणमत करून आदा केली जातात.
वृक्ष लागवडीच्या कामांकरिता स्थानिक मजुरांना डावलून बाहेरच्या मजुरांना कामे देऊन त्यांची आर्थिक लूट केली जात असल्याची अनेक महिला मजुरांची तक्रार आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये वृक्ष लागवड केलेल्या क्षेत्राची माहिती आणि तपशील देण्यास सामाजिक वनीकरण आणि वन विभागाचे अधिकारी टाळाटाळ करत आहेत.
सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक चोबे,वन विभागाचे उपविभागीय अधिकारी पौळ यांच्यासह तुळजापूर, उस्मानाबाद विभागाचे वन अधिकारी चौगुले,उमरगा लोहारा आणि भूम, परंडा, कळब, वाशी येथील अधिकार्यांनी संगणमताने शासनाच्या कोट्यावधी रुपयाच्या निधीवर दरोडा टाकण्याची तक्रार उंबरे-पेंढारकर यांनी केलेली आहे.