उमरगा (माधव सुर्यवंशी) 

जगभरात पाणी टंचाईवर मात करून पाणी वाचविण्या करिता विविध प्रकारचे प्रयोग केले जातात. त्यातलाच अत्यंत कमी खर्चिक व सोपा प्रयोग म्हणून रेन वॉटर हार्वेस्टिंगचे नाव घेतले जाते. रोजगार हमी योजने अंतर्गत रेनवॉटर हार्वेस्टिंग योजना शहरी व ग्रामीण भागातील सर्व शासकीय इमारतींमध्ये राबविता येऊ शकते. मात्र, यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे ही योजना अनेक वर्षांपासून केवळ कागदावरच राहिली आहे.

उमरगा शहरासह गावोगावी झपाट्याने सिमेंटच्या बहुमजली इमारती तयार झाल्या. मुख्य रस्त्यांसह वस्त्यांमध्ये सिमेंट रस्त्यांचे जाळे विणले गेले. त्यामुळे जमिनीत पाणी मुरण्यासाठी जागा राहिली नाही. राज्य सरकारने रेनवॉटर हार्वेस्टिंगच्या अंमल बजावणी करिता निर्देशही दिले आहेत. परंतु संबंधित विभागाने हे आदेश गुंडाळून ठेवल्याचे दिसते. शासकीय इमारतींच्या गच्चीवर जमा होणारे पाणी पाइपद्वारे खाली घेऊन त्याची साठवण तसेच जमिनीत मुरविणे सहजपणे करता येते. रेनवॉटर हार्वेस्टिंग योजना रोजगार हमी योजनेतून राबविण्यासाठी तरतूद आहे. ग्रामीण भागात योजना राबविण्यासाठी पंचायत समितीकडे प्रामुख्याने जबाबदारी आहे. परंतु, पंचायत समितीने आतापर्यंत या योजनेत प्रत्यक्षात उतरविण्यात किती प्रयत्न केलेत व ग्रामपंचायत स्तरावरून किती सहकार्य मिळाले, हे एक कोडेच आहे. त्यामुळे ही योजना केवळ कागदावरच पाहायला मिळत आहे.


तालुक्यातील ग्रामपंचायत, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र आदी विभागांच्या शासकीय कार्यालय परिसरात रेनवॉटर हार्वेस्टिंग करून ही योजना मनरेगा योजनेअंतर्गत यशस्वी करता येऊ शकते. परंतु, इच्छाशक्ती अभावी ही योजना आजवर कागदावरच आहे. यासाठी तालुक्यातील संबंधित गावांचे ग्रामसेवक, तलाठी यांच्याकडून कसलाच प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे अद्यापपर्यंत ही योजना कोणत्याही गावात राबविण्यात आली नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.


आधीच्या काळात छोटे-छोटे तलाव निर्माण करून त्यात पावसाचे पाणी साठविले जायचे. साठलेले पाणी जमिनीत झिरपल्याने भूजल पातळी वाढायची. आता सगळीकडे सिमेंटीकरण झाल्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत झिरपत नाही. त्यामुळे रेन वॉटर हार्वेस्टिंग महत्त्वाचे आहे. राज्य सरकारने पहिल्यांदा  6 जून 2007 व नंतर पुन्हा  15 जून 2016 ला अशी दोन वेळा रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याबाबत अधिसूचना काढली. परंतु याकडे प्रशासनाने दुर्लक्ष करून राज्य शासनाचे निर्देशच धुडकावल्याचे चित्र आहे.


 
Top