नळदुर्ग (प्रतिनिधी)- आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नामुळे नळदुर्ग नगरपालिकेला विविध विकास कामांकरीता महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडुन तब्बल 4 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आले आहे. या निधी मंजुरीचे पत्र नगरपालिकेला प्राप्त झाले आहे.या निधीमधुन ऐतिहासिक नळदुर्ग शहरात महात्मा बसवेश्वर महाराज स्मारक येथे उद्यान विकसित करणे, राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक स्मारक येथे उद्यान विकसित करणे व नळदुर्ग येथे शादीखाना बांधकाम करणे ही कामे होणार आहेत.
नळदुर्ग शहराच्या सर्वांगिण विकासासाठी आमदार राणा जगजितसिंह पाटील हे सातत्याने प्रयत्न करीत आहेत. शहराच्या विकाससाठी आमदार पाटील यांनी मोठ्याप्रमाणात निधी आणला आहे. नगरपालिकेच्या आजपर्यंतच्या इतिहासात इतका मोठा निधी नगरपालिकेला कधीच मिळाला नव्हता. मात्र आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नामुळे आज नळदुर्ग शहराच्या विकासासाठी भरगच्च निधी उपलब्ध होत आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील हे शहराच्या विकासासाठी निधी आणत आहेत मात्र शहरातील भाजपच्या कांही पदाधिकार्यांच्या अंतर्गत हेवेदाव्यामुळे शहरात विकासाची कामे मार्गी लागत नाहीत ही दुर्दैवाची बाब आहे. शहरांतील भाजपाच्या पदाधिकार्यांनी वेळीच आपले अंतर्गत वाद मिटवुन आलेल्या निधीचा योग्य वापर करून शहरात विकास कामे करून घेणे गरजेचे आहे. नाही तर देव आले द्यायला, आणि पदर नाही घ्यायला अशी परिस्थिती झाल्याशिवाय राहणार नाही.
आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्र सरकारने वैशिष्ट्येपुर्ण योजनेअंतर्गत नळदुर्ग नगरपालिकेला 4 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजुर केला आहे. या निधीमधुन नळदुर्ग येथे महात्मा बसवेश्वर महाराज स्मारक येथे उद्यान विकसित करणे या कामांसाठी 75 लाख रुपये, माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक स्मारक येथे उद्यान विकसित करणे या कामासाठी 75 लाख रुपये, नळदुर्ग येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मारक येथे उद्यान विकसित करणे या कामासाठी 1 कोटी रुपये, व नळदुर्ग शहरात शादी खाना बांधकाम करण्यासाठी 2 कोटी असे एकुण 4 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजुर झाला आहे.
निजामाच्या जोखडातुन मराठवाडा मुक्त होऊन यावर्षी 17 सप्टेंबर 2023 रोजी 75 वर्षे पुर्ण होत आहेत. मराठवाडा मुक्ती आंदोलनात ऐतिहासिक नळदुर्ग शहराचे फार मोठे योगदान आहे. देशाचे पहिले अशोकचक्र पुरस्कार विजेते भारतीय सैन्य दलातील जवान बचित्तरसिंह हे 13 सप्टेंबर 1948 रोजी नळदुर्गच्या ऐतिहासिक अलियाबद पुलावर निजाम व निजामाने पोसलेल्या रझाकारांशी लढताना शहीद झाले होते. या कामगिरी बद्दलच त्यांना भारत सरकारने मरणोत्तर अशोकचक्र पुरस्कार बहाल केला होता. असा जाज्वल्य व आजच्या पिढीला प्रोत्साहन दिला जाणारा इतिहास याठिकाणी घडलेला असताना आजपर्यंत याकडे सर्वांनी दुर्लक्ष केले होते. मात्र मराठवाडा मुक्ती संग्रामाचा धगधगता इतिहास आजच्या पिढीला माहीत व्हावा यासाठी नळदुर्गच्या ऐतिहासिक अलियाबद पुल परीसरात मराठवाडा मुक्ती संग्राम स्मारक उभारून त्याठिकाणी परीसरात विकास कामे करण्यासाठी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी 1 कोटी रुपयांचा निधी शासनाकडुन मंजुर करून आणला आहे. याबद्दल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे अभिनंदन करावे लागेल. या कामांमुळे नळदुर्ग शहराच्या वैभवात भर पडणार आहे.