धाराशिव (प्रतिनिधी) - पालकमंत्री तथा आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या प्रयत्नातून जिल्हयाच्या विकासाला गती मिळत आहे. त्यामुळे विविध योजना आणि प्रकल्प येत असल्याने त्यासाठी मोठा निधी जिल्हयाला उपलब्ध होत आहे.यात भर घालत आता उस्मानाबाद येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले असल्याने व जिल्हा रुग्णालयाचे ठिकाण वैद्यकीय महाविद्यालसास दिले असल्याने जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न निर्माण झाला होता. पालकमंत्री यांच्या पुढाकार आणि पाठपुराव्यामुळे नवीन जिल्हा रुग्णालयाला देखील मंजुरी देण्यात आली आहे.या जिल्हा रुग्णालयासाठी जागा अधिग्रहीत करून सदर जागेवर नवीन जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम तसेच पदनिर्मितीबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येणार आहे.यापूर्वी 30 जूनच्या शासन निर्णयानुसार भूम तालुक्यातील पाथ्रुड, ईट आणि माणकेश्वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यासही शासनाकडून मान्यता मिळाली आहे.
पालकमंत्री डॉ. सावंत यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे भूम तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राना 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय आणि उस्मानाबाद येथे नवीन जिल्हा रुग्णालय मंजूर झाल्याने जिल्ह्याच्या ठिकाणी रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार हे मात्र निश्चित आहे.