राजा वैद्य
धाराशिव - जिल्ह्यातील शेतकर्यांच्या अडचणी संपण्याच्या ऐवजी वाढच होत चालली आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टी तर या वर्षी अपुरा पाऊस त्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटाच्या चक्रात सापडले आहेत. त्यामुळे गेल्या सात महिन्यात जिल्ह्यात एकूण 102 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकरी आत्महत्येचे शतक पार केले असेल तरी सरकारची मदत मात्र 50 ट्नकेच शेतकरी परिवाला मिळाली आहे.
अतिवृष्टी, किडीचा प्रादुर्भाव तर कधी अपुरा पाऊस त्यामुळे अनेकदा शेतकर्यांचे हाततोंडाला आलेले पीक वाया जाते. सरकारच्या पातळीवर शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून पीकविमा, अतिवृष्टीचे अनुदान, या योजना घोषित केल्या असल्या तरी प्रत्यक्षात शेतकर्यांच्या पदरात मात्र उशिरा व तुंटपुजे मदत मिळत असते. आर्थिक संकटामुळे शेतकर्यांना बर्याचदा काही बँका दारात उभारू देत नाहीत म्हणून सावकाराकडे जावे लागते. त्यामुळे अनेक शेतकर्यांच्या नशिबी नैराश्य येते.
2020 च्या पीकविम्या बाबत तर शेतकर्यांच्या पिकांचे योग्य पंचनामे न करताच पीक विमा कंपनीने शेतकर्यांना मदत नाकारून सुप्रिम कोर्टापर्यंत जाण्याची मजल मारली. बराचदा पाहणीसाठी आलेले मंत्री, राजकीय नेते नुसत्याच घोषणा करून निघून जातात. त्या घोषणेची अंमलबजावणी होण्यास वर्ष लागते. तोपर्यंत शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडलेला असतो. या आदी कारणामुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. मे 2023 मध्ये एकूण 20 शेतकर्यांनी आपले जीवन संपविले. तर मार्च 2023 मध्ये 18 शेतकर्यांनी आपले जीवन संपविले. जानेवारी 2023 मध्ये 12, फेब्रुवारी 2023 मध्ये 13, एप्रिल 2023 मध्ये 17, जून 2023 मध्ये 10, जुलै 2023 मध्ये 12 शेतकर्यांनी आर्थिक संकटाला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत.
102 पैकी 66 शेतकर्यांनाच मदत
शेतकरी आत्महत्या बाबत सरकारने मदतच्या विविध योजना राबविल्या जातात. या योजनेबाबत अनेक अटी व नियम जाचक असल्यामुळे जिल्ह्यात आत्महत्या केलेल्या 102 शेतकर्यांपैकी 66 शेतकरीच सरकारच्या मदतीसाठी पात्र ठरले. तर 13 शेतकर्यांचे परिवार शेतकर्यांची आत्महत्या होवून देखील अपात्र ठरले आहेत. तर 23 शेतकरी आत्महत्येचे प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. शेतकर्यांच्या आत्महत्येनंतर सुध्दा लालफितीच्या कारभारामुळे शेतकर्यांना न्याय मिळत नसल्याचे दिसून येत आहेत.