धाराशिव (प्रतिनिधी)- हिंदू धर्मीयांसाठी श्रावण महिना पवित्र मानला जातो, या महिन्यात महादेवाची पूजा केली जाते. गावखेड्यातील मंदिरांपासून ते 12 ज्योतिर्लिंग महादेव मंदिरांमध्येही भाविकांची मोठी गर्दी असते. मात्र, गावातील मंदिरांत भाविकांच्या सोयी-सुविधा आणि जिर्णोद्धाराचा प्रश्न दरवर्षी पुढे येतो. तूळजापूर तालुक्यातील पिंपळा खुर्द गावातील महादेव मंदिर 'ब' दर्जाचे तिर्थक्षेत्र ठरावे, अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली. या मागणीसाठी आता भाजपाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष आणि धाराशिवपुत्र बसवराज मंगरुळे यांनी पुढाकार घेतला आहे. मंगरुळे यांनी पिंपळा खुर्द गावात सोमवारी भेट दिली. यावेळी, येथील प्रसिद्ध ग्रामदैवत असलेल्या महादेव मंदिरा जाऊन दर्शन घेतले. येथील गावात जागृत महादेव मंदिर असून ते मंदिर सध्या क वर्गात आहे. मात्र, या मंदिराच्या जिर्णोद्धार व विकासासाठी मंदिराला 'ब' वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी मागणी गावकऱ्यांनी केली. त्यावेळी, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना भेटून निवेदन देत कागदपत्रांची पूर्तता करण्याचे मंगरुळे यांनी सूचवले. तसेच, मीही याबाबत पाठपुरावा करेल, असा विश्वास गावकऱ्यांना दिला. मंगरुळे यांचे भाजपमध्ये मोठे स्थान आहे, भाजपमध्ये त्यांच्या शब्दाला किंमत आहे. त्यामुळे, ग्रामस्थांना त्यांच्याकडून मंदिराच्या सोयी-सुविधा आणि विकासाची आस लागली आहे. याप्रसंगी नेताजी डांगे, शशिकांत कदम, शंकर कदम, निशांत मस्के, तुकाराम भाऊ महाराज, तुकाराम दणके, विष्णू शिंदे, संजय कदम, महादेव कदम, पोपट कदम, विराज गिरी यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.