नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग नगरपालिकेच्या वतीने 7 कोटी रुपये खर्चाचे सुरू केलेली विकास कामे ठेकेदाराच्या निष्क्रियतेमुळे अतीशय संथगतीने सुरू असुन गेल्या अडीच महिन्यात 32 पैकी फक्त दोनच कामे पुर्णत्वाच्या मार्गावर आहेत. इतर कामे अद्याप सुरू झालेली नाहीत. नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराला सर्व कामे वेळेत पुर्ण करून देण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी होत आहे.
आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नामुळे नळदुर्ग नगरपालिकेला विविध विकास कामांसाठी 7 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यामध्ये शहरांतील विविध भागांत एकुण 32 कामे होणार आहेत. या सर्व कामाचे टेंडर उमरगा येथील पारस कन्स्ट्रक्शनला मिळाले आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांनी दि.6 जुन 2023 रोजी पारस कन्स्ट्रक्शनला काम सुरू करण्याचा कार्यारंभ आदेश दिला आहे. मात्र आज 24 ऑगस्ट 2023 ही तारीख आली तरी पारस कन्स्ट्रक्शनने 32 पैकी फक्त 2 कामेच पुर्ण केले आहेत. इतर पाच कामे सुरू होण्याच्या मार्गावर आहेत मात्र अद्याप ती कामेही पुर्ण क्षमतेने सुरू नाहीत. पारस कन्स्ट्रक्शन ही विकास कामे करण्यात साफ अपयशी ठरली आहे. पारस कन्स्ट्रक्शनच्या या निष्क्रियतेमुळे शहर विकास कामात अडथळा निर्माण होत आहे.वास्तविक पाहता पारस कन्स्ट्रक्शनला कामे सुरू करण्याचा कार्यारंभ आदेश देऊन अडीच महिन्याचा कालावधी झाला आहे. एवढ्या कालावधीत रस्ते आणि गटार बांधणीचे काम पुर्ण झाले असते. गणेशोत्सव आता तोंडावर आला आहे. गणेशोत्सवापुर्वी ही रस्त्याची कामे पुर्ण होणे गरजेचे होते. मात्र पारस कन्स्ट्रक्शनच्या निष्क्रियतेमुळे ही कामे पुर्ण होऊ शकली नाहीत. कामे संथगतीने सुरू होण्यामागे अनेक कारणे असले तरी ही कामे वेळेत पुर्ण करण्याची जबाबदारी ही पारस कन्स्ट्रक्शनचीच आहे. मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांनी पारस कन्स्ट्रक्शनला सर्व 32 कामे वेळेत पुर्ण करून घेण्याचे आदेश द्यावेत. त्याचबरोबर रस्ते व गटार बांधणीचे कामे गणेशोत्सवापुर्वी ठेकेदाराने करावे याबाबत ठेकेदाराला नोटीस बजावणे गरजेचे आहे.गणेश विसर्जन मार्ग ते मराठा गल्ली या रस्त्याचे काम गणेशोत्सवापुर्वी होणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.