धाराशिव (प्रतिनिधी)-कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विज्ञान केंद्र, माविम, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रानभाजी महोत्सव 2023 चे उद्धाटन जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते आज जिल्हा मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये करण्यात आले.
यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाच्या प्रकल्प संचालिका प्रांजल शिंदे, आत्माचे प्रकल्प उपसंचालक अभिमन्यू काशिद, उस्मानाबाद उपविभागीय कृषी अधिकारी श्री.असलकर, भूमचे उपविभागीय कृषी अधिकारी एस.के.भोसले, उस्मानाबाद तालुका कृषी अधिकारी एस.पी.जाधव तसेच तालुका कृषी अधिकारी परंडा, भूम, वाशी आणि तुळजापूर आदी उपस्थित होते.
कचरा म्हणून ज्या रानभाज्या आपण टाकून देतो अशा भाज्या आयुर्वेदात मौल्यवान समजल्या जातात. अशा गुणकार भाज्यांचा अनेक व्याधींवर उपचार करण्याकामी उपयोग केला जातो. मानवी शरीरासाठी पौष्टिक असणाऱ्या रानभाज्यांकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होताना दिसत आहे. फास्टफूड, जंकफूड सेवन करणाऱ्या तसेच सर्व नागरिकांना रानभाज्यांचे महत्व कळावे, त्याचा उपयोग आणि फायदे काय आहेत याची माहिती सर्वांना व्हावी या उद्देशाने रानभाजी महोत्सवाचे आयोजन याठिकाणी करण्यात आले आहे, असे जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले.
रानभाजी महोत्सव 2023 चे उद्धाटन कार्यक्रम पाहणी करताना श्री.कुलकर्णी बोलत होते. कमी पाण्यात येणाऱ्या रानभाज्या ह्या अत्यंत गुणकारी असतात. रानभाज्या डोंगराळ, पडीक जमीनीवर मोठ्या प्रमाणावर सहज उपलब्ध होतात. या रानभाजी महोत्सवात जिल्हाभरातून अनेक शेतकरी, महिला बचत गट सहभागी झाले होते. तुळजापूर येथील लोकप्रबोधन संस्था, महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत माता सावित्री लोकसंचलित साधन केंद्र उस्मानाबाद, कळंब तालुका वाघोली येथील हिरकणी शेतकरी गट, कसबे-तडवळे येथील उमेद अतंर्गत सरस्वती महिला उत्पादक गट आणि कल्पना महिला बचतगट, भूम तालुक्यातील अंतरवली येथील योगेश्वरी महिला बचत गट आणि ज्योती महिला बचत गट, बेदरवाडी येथील संस्कृती महिला बचतगट आदींनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता.
रानभाजी महोत्सवात पाथर, घोळ, फांजची भाजी (नाय), काठेमाट, कुरडू, गुळवेल, तांदुळसा, सराटा, गवती चहा, शेवगा, पिंपळपान, केना, कुंजीर, चिगळ, चाकवत, करटूले, तोंडले, आघाडा, चिल, हुलगा, वटाणे, अंबाडी, मटारु, कपाळफोडी, दिंडा, उंबर, आंबुशी, कुडा, टाकळा, हादगा आदी भाज्यांचे प्रदर्शन तसेच काही रानभाज्यांपासून तयार कलेले पदार्थसुध्दा चव चाखण्यासाठी स्टॉलवर उपलब्ध करुन देण्यात आले होते.