नळदुर्ग (प्रतिनिधी)- जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी दि.23 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय महामार्गाच्या बायपास रस्त्याच्या कामाची पाहणी करण्याबरोबरच नळदुर्ग-अक्कलकोट रस्ता, नळदुर्ग येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, आपलं घर तसेच ऐतिहासिक अलियाबद पुलाची पाहणी केली.
दि.23 ऑगस्ट रोजी धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी नळदुर्गसह अणदुरला भेट दिली. या भेटीत त्यांनी नळदुर्ग शहराच्या बाहेरून गेलेल्या बायपास रस्त्याच्या सद्यस्थितीतील कामाची पाहणी केली. त्याचबरोबर अर्धवट अवस्थेत असलेल्या घरकुल योजनेतील घरांची पाहणी केली. यानंतर नळदुर्ग–अक्कलकोट रस्त्याची शहापुर गावापर्यंत जाऊन त्यांनी पाहणी केली यावेळी शहापुर येथे त्यांनी ग्रामस्थ व शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर नळदुर्ग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन आरोग्य केंद्राची पाहणी केली. तसेच नळदुर्ग येथील आपलं घर प्रकल्पास भेट देऊन त्यांनी जेष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांच्याशी संवाद साधला.
त्याचबरोबर यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम आंदोलनात निजामाच्या जोखडातुन मराठवाडा मुक्त होण्यासाठी ज्याचे फार मोठे योगदान लाभले त्या ऐतिहासिक अलियाबाद पुलाची पाहणी केली. याठिकाणी त्यावेळी रझाकारांशी लढताना शहीद झालेले व ज्यांना मरणोत्तर भारताचा पहिला अशोकचक्र पुरस्कार मिळाला ते शहीद भारतीय जवान बचित्तरसिंह यांचे अलियाबद पुल परीसरात स्मारक उभारण्यात येणार आहे. त्या जागेची पाहणीही यावेळी जिल्हाधिकारी डॉ. ओंबासे यांनी केली. यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार हे उपस्थित होते.