धाराशिव (प्रतिनिधी)- उस्मानाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा आणि इमारतीची गरज आहे.यासाठी लवकरच मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत बैठक आयोजित करु अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज शिंगोली येथील शासकीय विश्रामगृह येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अनुषंगाने आढावा घेतांना आयोजित बैठकीत दिली. यावेळी आमदार कैलास पाटील यांनी तातडीने बैठक बोलावण्याची मागणी केली.
दोन वर्षांपूर्वी येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात आले. सध्या जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात हे महाविद्यालय कार्यरत आहे.आता पुढच्या वर्षांसाठी नवीन विद्यार्थ्यांच्या प्रवेशामुळे महाविद्यालयास जागा कमी पडत आहे.तसेच जिल्हा रुग्णालयास होत असलेली गैरसोय पाहता वैद्यकीय महाविद्यालयासाठी लवकरात लवकर जमीन संपादन करुन त्यावर इमारतीचे बांधकाम त्वरीत सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल,असेही ते म्हणाले.
यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेवून कोणतेही जागा फायनल करा पण जागेचा प्रश्न सोडवा. वैद्यकीय महाविद्यालयासाठी सध्याची जागा अपुरी पडत असून, प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष, विद्यार्थी वसतीगृह त्यामुळे जागेचा तातडीने प्रश्न मिटवा अशी आग्रही मागणी करून वैद्यकीय सेवा सुधारण्यासाठी तत्काळ आदेश द्यावेत व या संदर्भात मंत्रालयात बैठक घ्यावी अशीही मागणी केली.
याविषयी वैद्यकीय शिक्षण सचिव व धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रतिनिधीची बुधवार 30 ऑगस्ट रोजी मंत्रालयात बैठक घेण्याचेही नियोजित केले.
वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ.अजय चंदनवाले, निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, तहसिलदार डॉ.शिवानंद बिडवे, अधिष्ठाता डॉ.शिल्पा दोमकुंडवार, उपअधिष्ठाता उज्वला गवळी, डॉ.सचिन देशमुख, प्रा.डॉ.मंगेश सेलूकर, प्रा.डॉ.सुषमा जाधव, प्रा.डॉ.सदानंद भिसे, डॉ.विश्वजीत पवार, डॉ.उदयकुमार पाध्ये, डॉ.संजय मगर, डॉ.योगेश गालफाडे तसेच वैद्यकीय शिक्षण संघटनेचे पदाधिकारी व वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक उपस्थित होते.