परंडा (प्रतिनिधी) - अण्णाभाऊ साठे यांचे लेखन सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत कॉम्रेड अमर शेख आणि लाल बावटा कलापथकाद्वारे त्यांनी प्रबोधनाचे काम केले असे प्रतिपादन प्रा. डॉ. हरिश्चंद्र गायकवाड यांनी केले.
येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालय परंडा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील जाधव तर व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. महेशकुमार माने, सांस्कृतीक विभाग प्रमुख डॉ.शहाजी चंदनशिवे, कनिष्ठ विभागाचे परिवेक्षक प्रा. किरण देशमुख, प्रा. विजय जाधव, प्रा. संभाजी धनवे यांची उपस्थिती होती.
यावेळी सृष्टी गुंडगिरे आणि कोमल ठोसर या विद्यार्थिनींनी आपली मनोगत व्यक्त केली. तर प्रा. विजय जाधव यांनीही विस्तृत स्वरूपामध्ये अण्णाभाऊ साठे यांचा जीवन पाठ समोर मांडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संभाजी धनवे यांनी केले तर अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ. सुनील जाधव यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी केले. तर आभार प्रा. किरण देशमुख यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.