धाराशिव  (प्रतिनिधी) - मराठवाड्याचा विकास केला जाईल असे सांगत संयुक्त महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याचा समावेश केला गेला. मात्र स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता होत असताना देखील दुष्काळग्रस्त मराठवाड्याचा मागासलेपणाचा कलंक अद्याप पर्यंत पुसलेला नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी व इतर अनेक प्रश्न जसेच्या तसे पडून आहेत. तेलंगणा राज्य स्वतंत्र झाल्यापासून अतिवेगाने प्रगती केली आहे. त्यामुळे तेलंगणाच्या धर्तीवर स्वतंत्र मराठवाडा राज्याची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी मराठवाडा मुक्ती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. बाबा उगले यांनी दि.१९ ऑगस्ट रोजी केली.

स्वतंत्र मराठवाडा राज्य निर्मिती व्हावी यासाठी मराठवाडा मुक्ती मोर्चाच्यावतीने जालना येथून दि.९  ऑगस्ट रोजी स्वतंत्र मराठवाडा राज्य निर्मिती जनजागृती यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.  ही यात्रा मराठवाड्यातील ८ जिल्ह्यातील ७६ तालुक्यामध्ये जाऊन जनजागृती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर आतापर्यंत जालना, परभणी, नांदेड, बीड व लातूर या जिल्ह्यामध्ये जनजागृती करण्यात आली असून उर्वरित तीन जिल्ह्यांमध्ये जनजागृती करून दि.२४ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे या यात्रेची सांगता करण्यात येणार असल्याचे प्रा. उगले यांनी सांगितले. गेल्या ५ वर्षापासून मराठवाड्यातील गाव, वाडी, वस्ती व तांड्यावर याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. मात्र सत्ताधारी मंडळी फक्त बैठका घेऊन वेळ निभावून नेत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशावर इंग्रजांनी राज्य केले आहे आता पश्चिम महाराष्ट्रातील काळे इंग्रज मराठवाड्यावर राज्य करीत असून त्यांना काढून टाकायचे असल्याचा इशाराही त्यांनी दिला. मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळत नसल्यामुळे मराठवाड्यातील २७ साखर कारखाने बंद पडले असून ते पश्चिम महाराष्ट्रातील मंडळी विकत घेऊन दादागिरी करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. विशेष म्हणजे मराठवाडा स्वतंत्र झाला तर मुख्यमंत्री, राज्यपाल, स्वतंत्र मंत्रिमंडळ, मंत्रालय व विविध कार्यालय तयार होण्याबरोबरच केंद्राचा निधी येऊन मराठवाड्याचा निश्चितच विकास होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या यात्रेमध्ये प्रदेश कार्याध्यक्ष भरत मानकर, कोषाध्यक्ष गजानन भांडवले, धाराशिव जिल्हाध्यक्ष सुरेश शेळके, ज्येष्ठ मार्गदर्शक अहमद, दादासाहेब जेटीथोर, उद्धव लोंढे, शाहीर आप्पासाहेब उगले, विशाल उगले, सुनील उगले, ज्ञानेश्वर उगले, रोहिदास काटे, सुधीर पवार, अनिल खंदारी, तुकाराम शिंदे आदींसह कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
 
Top