धाराशिव (प्रतिनिधी) -धाराशिव सारख्या आकांक्षीत जिल्ह्यामध्ये शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्व आहे. येथील विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात स्वतंत्र विद्यापीठ व केंद्रीय विश्वविद्यालयाची मागणी करण्यात आली आहे. तसेच उपकेंद्रातील आवश्यक कामांसाठी विकास आराखडा तयार कराण्याच्या सूचना कुलगुरूंना देत, निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी विद्यापीठ उपकेंद्राच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.
एनबीए नामांकनाप्रमाणे आवश्यक इमारत, क्रीडांगण व ऑडिटोरियम बांधकामासाठी रु 25 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याच्या सूचना आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिल्या. मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये धाराशिव जिल्हा हा अतिशय संवेदनशील जिल्हा होता. येथील अनेक स्वातंत्र्यवीरांनी या लढ्यामध्ये मोठे योगदान दिलेले आहे. त्यामुळे या अमृतमहोत्सवी वर्षात मराठवाडा मुक्तिसंग्राममावर रिसर्च सेंटर विद्यापीठात सुरू करता येणे शक्य आहे का? याबाबत विचार करावा? असे ते म्हणाले. ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी आदरणीय यशवंतराव उर्फ बुबासाहेब जाधव यांची जीवन साधना या पुरस्कारासाठी विद्यापीठाने केलेली निवड अतिशय सार्थ असून त्यांचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले. आपल्या सर्वांच्या सहकार्याने धाराशिव येथे उपकेंद्र सुरू असून राज्यमंत्री पदाच्या कार्यकाळात एमआयडीसी कडील जमीन उपकेंद्रासाठी दिल्याच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. येथील शैक्षणिक चळवळीला गती देण्यासाठी स्वतंत्र विद्यापीठाची मागणी कायम असून केंद्रीय विश्व विद्यालयाची देखील मागणी करण्यात आली असल्याचे ते म्हणाले.
यावेळी कुलगुरू डॉ प्रमोद येवले, उपकेंद्र संचालक डॉ. प्रशांत दिक्षित, प्र.कुलगुरू प्रा.डॉ.श्याम शिरसाट, व्यवस्थापन परिषद सदस्य श्री.बसवराज मंगरूळे, डॉ.जी.बी.पाटील, कुलसचिव प्रा.डॉ.भगवान साखळे, सिनेट अधिसभा सदस्य देविदास पाठक, गौतम पाटील, प्रा.संजय कोरेकर, डॉ.सतीश गावित, नितीन जाधव, डॉ.सतीश कदम, अँड, खंडेराव चौरे, युवराज नळे, डॉ.रमेश दापके, डॉ.जयसिंगराव देशमुख, प्राचार्य डॉ.सुनील पवार यांच्यासह प्राध्यापक, अधिकारी कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.