कळंब (प्रतिनिधी)- मागील सरकारने घोषणा केलेल्या महात्मा फुले कर्जमाफी योजने च्या लाभ पासून  सरकारने लादलेल्या जाचक अटी व शर्ती मुळे कळंब तालुका व धाराशिव जिल्ह्यातील अनेक शेतकरी वंचित आहेत. या शेतकऱ्यांना सरसकट (विना निकष) पीक कर्ज माफीचा लाभ धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तहसीलदार कळंब यांच्यामार्फत दिलेल्या निवेदनात केली आहे.

या निवेदनात कळंब तालुका व धाराशिव जिल्ह्यामध्ये नेहमीच पावसाचे प्रमाण हे कमी असते  यावर्षी देखील  पीक वाढीच्या अवस्थेमध्ये मागील तीन आठवड्या पेक्ष्या जास्त काळ पावसाने ओढ दिलेली आहे. व अशी अवस्था सतत आल्यामुळे सोयाबीन पीक  धोक्यात येते. सोयाबीन हे पीक या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक कणा आहे. सोयाबीन पिकाच्या सतत नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या प्रचंड नुकसानीमुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आलेला आहे. त्यातून अनेक शेतकरी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत.

अनेक शेतकऱ्यांनी जोड धंद्यासाठी विविध बँकांकडून कर्ज मिळावे म्हणून उत्पन्न नसताना देखील टॅक्स भरला आहे व व्यवसाय थाटला आहे. अपुरा व कमी पाऊस त्यामुळे होणारी नापिकी या कारणाने शेतकरी आर्थिक संकटात आहे. बाजारपेठ शेती व्यवसाय व शेतकऱ्यावर अवलंबून असल्याने बाजार पेठेमध्ये ग्राहक उपलब्ध होत नाही. साहजिकच व्यवसायामध्ये देखील नुकसान होऊन अनेक शेतकरी कुटुंबे कर्जबाजारी झालेले आहेत. येथील मार्केट हे पूर्णपणे शेती उत्पन्नावर आधारित असल्याने शेती पिकाचे नुकसान झाले की त्याचा सरळ फटका व्यवसायाला बसतो व मार्केटमध्ये ग्राहक नसल्यामुळे व्यवसायासाठी घेतलेलले कर्ज व शेतीसाठी घेतलेल पिक कर्ज अशा दुहेरी कर्जाच्या ओझ्या खाली अनेक शेतकरी कुटुंबे दबली गेली आहेत.

शेतकऱ्यावरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी कर्जमाफीचा लाभ अद्याप न मिळालेल्या शेतकऱ्यांना सरसकट दोन लाख रुपये पर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळावा. यामुळे शेतकऱ्यांनी या संकटकाळी मदत होईल. या निवेदनावर शेतकरी ॲड. मनोज चोंदे, ॲड. दिलीपसिंह देशमुख, रघुनाथ चोंदे, भारत चोंदे, राजाभाऊ कोळपे, उत्तरेश्वर चोंदे, अमर चोंदे, शिवप्रसाद बियाणी, कमलाकर पाटील, पोपट  आंबीकर ,बळीराम चोंदे,  सुधीर चोंदे, बाप्पा चौधरी, सय्यद बी. आर. विक्रम गायकवाड, श्याम नरवडे, गुणवंत वाडे आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.


 
Top