तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यामध्ये मागील 23 दिवसापासून पावसाने दडी मारली असून खरिपातील सोयाबीन उडीद तूर मका इत्यादी पिके धोक्यामध्ये आहेत. सध्या पावसाची अत्यंत आवश्यकता असून पावसा अभावी पिके करपून जात आहेत. त्यामुळे शासनाने तात्काळ पीक विम्याची 25% अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना मंजूर करून अदा करावी अशी मागणी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केली आहे.

यावेळी पुढे बोलताना मधुकरराव चव्हाण म्हणाले की, सध्या शेतकरी अत्यंत संकटात असून त्याच्या कोणत्याही मालास भाव मिळत नाही. शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या फक्त घोषणा झाल्या. प्रत्यक्षात मशागतीचे दर खते बियाणे औषधे व पीक काढणीचा खर्च पाहता केलेल्या खर्चाचाही ताळमेळ बसत नाही. त्यामुळे शेतकरी अत्यंत मेटाकोटीस आलेला आहे. त्यातच महावितरणचा भोंगळ कारभार शेतकऱ्यांना मारक ठरत आहे. त्यामुळे शेती वरचेवर आतबट्ट्याचा धंदा होत असून शासनाने त्याची तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना अग्रीम पीक विमा मंजूर करून अदा करावा अशी मागणी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केलेली आहे.


 
Top