धाराशिव (प्रतिनिधी)- 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे यावर्षी अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येणार आहे. या निमित्ताने जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.24 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता,जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे,निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे व उपजिल्हाधिकारी संतोष भोर यांची प्रमुख उपस्थिती होती.

ओम्बासे यावेळी म्हणाले की,जिल्ह्याच्या विकासात्मक बाबींसाठी यंत्रणांनी निधी मागणीचे प्रस्ताव सादर करावे.मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षात विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून जिल्ह्याच्या विकासाला गती द्यावी.यंत्रणांनी निधी मागणीचे प्रस्ताव सादर करताना परिपूर्ण प्रस्ताव सादर करावे.काही विभागांनी नाविन्यपूर्ण योजनेतून प्रस्ताव सादर करावे.17 सप्टेंबरपर्यंत ज्या ठिकाणी स्मृतीस्तंभाची उभारणी करायची आहे, त्या ठिकाणी हे स्मृतिस्तंभ उभे करावेत तसेच मराठवाडा मुक्तीसंग्रामाची माहिती शालेय विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी तयार करण्यात आलेल्या पुस्तकांचे वितरण शाळांना करण्यात यावे असे त्यांनी यावेळी सांगितले.   

उपजिल्हाधिकारी भोर यांनी 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित साधून आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमाची माहिती यावेळी दिली.जिल्ह्यात 75 हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.चिलवडी येथे स्मृतीस्तंभाची स्थापना,17 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात सर्व गावांमध्ये सायंकाळी 75 हजार दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील 75 हजार महिलांना आरोग्यविषयक सेवांचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.स्वातंत्र्य सैनिकांच्या नावाचे नामफलक तयार करून जिल्ह्यातील सर्व स्वातंत्र्य सैनिकांच्या घराच्या दर्शनी भागात लावण्यात येणार आहे.जिल्ह्यातील सर्व हुतात्मा स्मारकांचे सुशोभीकरण रंगरंगोटी, स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचा सत्कार,स्वातंत्र्य संग्राम सैनिकांना ओळखपत्रे,मराठवाडा मुक्तीसंग्राम याविषयावर वक्तृत्व,निबंध व रांगोळी स्पर्धा, काव्यसंध्या, गझल,संगीत,लोककला व व्याख्यानाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

सभेला स्वातंत्र्यसैनिक बुवासाहेब जाधव,समितीचे सदस्य युवराज नळे यांचेसह विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी, सर्व तहसीलदार व सर्व गटविकास अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.


 
Top