धाराशिव (प्रतिनिधी) - शहरात भुयारी गटार योजनेची कामे करण्यात येत आहेत. ही कामे व्यवस्थित करण्यात येत नाहीत. त्यामुळे प्रभाग क्रमांक 1 व 4 मधील सर्वच रस्त्यांवर चिखलाचा खच साचला असून नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. याकडे नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे जनतेची चिखलातून पायपीट सुरू आहे. चिखलात घसरून नागरिकांचे अपघात होत आहेत. त्यामुळे या प्रभागातील प्रश्न तातडीने सोडविण्यात यावा, या मागणीसाठी समाजसेवक प्रशांत साळुंके यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेवर दि. 31 जुलै रोजी थेट मोर्चा काढण्यात आला.
धाराशिव शहरातील प्रभाग क्रमांक 1 व 4 मध्ये भुयारी गटार योजनेची कामे करण्याच्या नावाखाली बाळासाहेब ठाकरे नगर, मिल्ली कॉलनी, शाहू नगर, नारायण कॉलनी, गालीब नगर, शिरीन कॉलनी, मेघदूत कॉलनी, निजामुद्दीन नगर आदीसह परिसरातील सर्व रस्ते उखडले आहेत. त्या रस्त्यावरील मुरुम व खडी गायब झाली असून काळी माती वर आली आहे. त्यामुळे सर्व रस्ते चिखलमय झाल्याने नागरिकांना चालताही येत नाही. पाय घसरून अनेकजण जखमी झाले आहेत. तर वाहनांचा अपघात होऊन अनेकांचे हात व पाय मोडलेले आहेत. त्यामुळे या भागातील सर्व रस्ते पूर्ववत व्यवस्थित करण्यात यावेत, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयापासून हा मोर्चा काढण्यात आला. हलगीच्या दणदणाट गगणभेदी घोषणा देत हा मोर्चा नगर परिषदेच्या प्रवेशद्वारात आला.
भूमिगत गटारीच्या कामामुळे प्रभाग 1 व 4 मधील जनतेची चिखलामधून पायपीट सुरू आहे. चिखलात वाहने घसरत असल्यामुळे अपघात घडत आहेत. या प्रश्नावर यापूर्वी नगर परिषदेसमोर चिखलफेक आंदोलन केले होते. मात्र झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे झोपेचे सोंग घेतलेल्या नगर परिषद प्रशासनाला जागे करण्यासाठी हा मोर्चा काढून नगर परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
..................................................
तब्बल तीन तास मोर्चेकर्यांचा ठिय्या !
मुख्याधिकारी वसुधा फड यांनी आंदोलन स्थळी येऊन मोर्चेकरांना या प्रभागातील रस्ते व गटारींची कामे करावीत असे लेखी व ठोस आश्वासन द्यावे या मागणीसाठी तब्बल दोन तास हे आंदोलन करण्यात आले. मात्र मुख्याधिकारी फड यांनी गाडीतून खाली उतरून थेट मोर्चेकर्यांच्या जथ्थ्यायून मार्ग काढीत थेट आपल्या कॅबिनमध्ये जाणे पसंद केले. त्यामुळे आंदोलक अधिक आक्रमकपणे घोषणाबाजी करीत असल्याचे पाहून त्यांनी शिष्टमंडळाने येऊन मागण्यांचे निवेदन द्यावे असा पोलिसांमार्फत संदेश दिला. त्यानंतर मुख्याधिकार्यांनी जिल्हा नियोजन अंतर्गत विकास कामे व या ड्रेनेज कामांतील तरतुदीनुसार बीबीएम कामे महीन्यात तातडीने केली जातील असे लेखी आश्वासन दिले.