धाराशिव (प्रतिनिधी)-अजित पवार यांनी फडणवीस यांच्यासोबत जावून राष्ट्रवादीमधील 9 जणांचा शपथविधी काल झाल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फुट पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीमध्ये नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात शरद पवार साहेबांसोबत असल्याचे जाहीर केले. 5 जुलैला शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बैठक बोलवली असून, या बैठकीला मोठ्या प्रमाणात नेते, कार्यकर्तेॅ जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी पु. वि. लोकराज्यशी बोलतानी दिली.

राज्यातील राजकारणाचे पडसाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उमटले आहेत. उस्मानाबाद जिल्हा हा एकेकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. परंतु आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ताकद कमी झाली. त्यात पुन्हा अजित पवार यांनी 9 आमदारांसह जावून शिंदे-फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात शपथविधी घेतला. त्यानंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही पक्ष चिन्ह व पक्षासह या सरकारमध्ये सामिल झाल्याचे जाहीर केले. तर शरद पवार यांनी आज सोमवार दि. 3 जुलै रोजी कराडमध्ये घेतलेल्या परिषदेत पक्ष पुन्हा नव्या जोमाने उभा करू, नेते गेले असले तरी कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत असे सांगून पक्ष फुटीचा प्रसंग या पूर्वीपण  माझ्यावर आला होता. त्याही वेळी दुप्पट जोमाने पक्ष वाढला असल्याचे सांगितले. 

जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते जीवनराव गोरे, डॉ. प्रतापसिंह पाटील, संजय दुधगावकर, मसूद शेख, खलिफा कुरेशी आदींनी आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे सांगितले. 


द्विधा मनस्थिती

भूंकपाच्या काळात शरद पवार  राज्यात मुख्यमंत्री होते. उस्मानाबाद जिल्ह्यात त्या काळात त्यांनी केलेल्या कार्याचा फार मोठा परिणाम आहे. त्याच प्रमाणे भूम व उमरगा तालु्नयात अजित पवार यांनी सहकार साखर कारखाना चालविण्यासाठी फार मोठे सहकार्य केल्यामुळे प्रमुख नेते व कार्यकर्ते अजित पवार यांच्या जवळचे आहेत. उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी आपण कार्यकर्त्यांशी चचार्र् करून लवकरच भूमिका जाहीर करू असे सांगितले. माजी आमदार राहुल मोटे यांनी मतदार संघातील कार्यकर्त्यांशी बैठक घेतली आहे. त्याप्रमाणे जिल्ह्यातील नेत्यांची व कार्यकर्त्यांची बैठक मुंबईच्या 5 जुलैच्या बैठकीनंतर घेण्यात येईल असेही सांगितले. जिल्ह्यात काही नेते व कार्यकर्ते साहेबां सोबत जायचे... का दादा बरोबर रहायचे. याबाबत द्विधा मनस्थितीत असल्याचे दिसून आले.


 
Top