धाराशिव (प्रतिनिधी)-एक महिन्याच्य हुलकावणीनंतर धाराशिव शहरात दि. 2 जुलै रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. तसेच तेर, येडशी, येरमाळा, लोहारा, तुळजापूर, उमरगा, कळंब तालु्नयातील काही भागात रिमझिम व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.
रात्री उशिरापर्यंत हलका पाऊस सुरू होता. यामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाला होता. मध्यम स्वरूपाचा पहिलाच पाऊस असल्याने धाराशिव शहरातील नाल्या भरून वाहिल्या. काही ठिकाणी प्लास्टिक अडकल्याने नालीचे पाणी रस्त्यावर आले. यामुळे रस्त्यावर घाण साचली होती. यंदा 7 जून रोजी मृग तर 22 जून रोजी आद्रा नक्षत्र निघाले असून, आद्रातील दहाव्या दिवशी धाराशिव शहरासह परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ रिमझिम व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. धाराशिव, तेरसह जिल्ह्यातील तुळजापूर, उमरगा, लोहारा, येरमाळा यासह तर भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. दोन दिवसापासून वातावरणात बदल जाणवत होता. रविवारी जिल्ह्यातील काही भागात रिमझिम तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यामुळे शेतकर्यांची हुरहुर काही प्रमाणात कमी झाली आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानूसार 30 जूननंतर जिल्ह्यात पावसाला सुरूवात झाली आहे. आगामी काळातही चांगला पाऊस झाल्यास 15 जुलैपूर्वीच खरीप पेरणी होण्यास मदत होणार आहे. पावसाळ्याचा एक महिना पूर्ण झाला. तरी धाराशिव शहरात शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला नव्हता. रविवारी चांगला पाऊस झाल्याने वातावरणात थंडावा निर्माण झाला होता.