धाराशिव (प्रतिनिधी)-भुयारी गटार योजनेच्या कामासाठी शहराच्या विविध भागात खोदलेल्या रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य असल्याने पावसाळ्यात नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. चिखलात वाहने घसरून अपघात होत असल्यामुळे नागरिकांमधून तीव्र संतापाची लाट उसळली. ही परिस्थिती ओळखून जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या सुचनेनुसार शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी गेल्या तीन-चार दिवसांमध्ये कोसळत्या पावसात प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन रस्त्यांवर मुरूम अंथरून घेतला. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शहरातील जिजाऊनगर, तुळजाई नगर, मुकुंद नगर, लक्ष्मीनगर, मिल्ली कॉलनी, गालिबनगर, समता नगर यासह विविध 15 ठिकाणी भुयारी गटार योजनेच्या कामामुळे खोदलेल्या रस्त्यांवर चिखल साचला होता. चिखलात वाहने घसरून अपघात होत असल्यामुळे अनेकजण जखमी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. अनेक भागात घरापर्यंत वाहन घेऊन जाता येत नसल्याने नागरिकांची तारांबळ होत होती. तर पायी जाताना सुद्धा मोठी कसरत करावी लागत होती. ही परिस्थिती ओळखून शहरातील विविध 15 भागातील रस्त्यांवर मुरूम टाकून नागरिकांची गैरसोय दूर करण्याचे आदेश पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी दिले होते. पालकमंत्र्यांच्या सुचनेनुसार जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी तातडीने कोसळत्या पावसात प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन रस्त्यावर मुरूम अंथरण्याचे काम पूर्ण करून घेतले. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापुढेही नागरिकांना रस्त्याची समस्या निर्माण झाल्यास आपणाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी केले आहे.


 
Top