धाराशिव (प्रतिनिधी)-केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीचे केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे लोकाभिमुख निर्णय धाराशिव जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाजनसंपर्क अभियानाच्या शेवटच्या टप्प्यात परिश्रम घ्यावे , प्रत्येक नागरिकांना केंद्र सरकारने डोळ्यासमोर ठेवून घेतलेले निर्णय आणि राज्य सरकार गतिमान पद्धतीने घेत असलेले निर्णय याची माहिती व्हावी यासाठी घरोघरी संपर्क करून प्रत्येक नागरिकांना याची माहिती द्यावी असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे यांनी केले.
रविवारी दि. 30 जुलै रोजी भारतीय जनता पार्टीच्या धाराशिव जिल्हा बैठकीत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपा प्रदेश सचिव किरण पाटील, माजी प्रदेश सरचिटणीस माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष संताजी चालूक्य, प्रदेश कार्यकारणी सदस्य सुधीर पाटील, अॅड. व्यंकटराव गुंड, अॅड. अनिल काळे, सतीश दंडनाईक, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश देशमुख, माजी जि.प. अध्यक्ष नेताजी पाटील, युवराज नळे, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, दत्ताभाऊ कुलकर्णी, रामदास कोळगे, सतीश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी आगामी काळात धाराशिव जिल्ह्यात प्रत्येक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा विजय होणे आवश्यक असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघावर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी तसेच लोकसभेत भाजपचा खासदार निवडून जाण्यासाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्र निहाय भाजपा कार्यकर्त्यांनी संघटनात्मक कामाची जबाबदारी घेऊन पक्ष वाढीसाठी काम करण्याची गरज व्यक्त केली.प्रत्येक नागरिकांपर्यंत केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या कामांची माहिती पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी यासाठी काढलेली प्रसिद्ध पत्रिके वापरून घरोघरी संपर्क करण्याच आवाहनही आमदार पाटील यांनी यावेळी केलं.
माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून कार्यकर्ता हेच या पक्ष संघटनेचे बलस्थान आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने हा पक्ष माझा आहे. आपला आहे असं समजून आपुलकीने काम करण्याची गरज व्यक्त केली.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे तसेच जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमांचे पूजन करून या जिल्हा बैठकीला प्रारंभ झाला. या बैठकीचे प्रास्ताविक रामदास कोळगे यांनी केले. तर आभार प्रदर्शन सतीश बाप्पा देशमुख यांनी मानले. या बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.