उमरगा (प्रतिनिधी)-तृतीय पंथीयांना समाजात जगताना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांना सर्व सामान्यासारखे जीवन जगता यावे व विकासाच्या प्रवाहात आणता यावे यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असून तृतीय पंथीयांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार गोविंद येरमे यांनी केले.

 उमरगा तहसील कार्यालयाच्या सभागृहात तृतीय पंथीयांना विविध योजनेचा लाभ देण्यासाठी एक दिवसीय शिबिर घेण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

या वेळी पुरवठा विभाग नायब तहसीलदार रामराम केलुरकर,रतन काजळे,जिल्हा उद्योग केंद्राचे श्री बिराजदार, समाज कल्याण विभागाचे ए.एस.मगर,स्टेट बँक ऑफ इंडियाचे मेघराज आदी अधिकारी उपस्थित होते.

शहरातील तृतीय पंथीयांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळण्यासाठी नोंदणी करून त्यांना समाज कल्याण विभागाचे ओळखपत्र,संजय गांधी योजनेचा लाभ,बँकेत खाते काढणे, पॅन कार्ड काढून देणे, जिल्हा उद्योग केंद्रातून कर्जासाठी नोंदणी करणे,अंत्योदय योजनेचा लाभ मिळवून देणे आदींच्या लाभासाठी हे शिबिर घेण्यात आले. यावेळी माया पटेल, सरीना पटेल, निहा पटेल, पिंकी पटेल, रविना मंडले, दगौरी घोडके, निकिता पांढरे आदींना विविध योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी फॉर्म भरून घेण्यात आले.यावेळी तहसील मधील कर्मचारी बालाजी पांचाळ, संदीप सरपे, दत्ता पवार श्रीमती ठाकूर आदींनी शिबिरास मदत केली.

 
Top