धाराशिव (प्रतिनिधी)-विद्यार्थ्यांची होणारी पायपीट थांबविण्यासाठी येवती बस दारफळ मार्गे सुरू करण्याची मागणी दारफळचे सरंपच अॅड. संजय भोरे यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे धाराशिव विभागीय नियंत्रक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, धाराशिव तालुक्यातील दारफळ येथील विद्यार्थी व विद्यार्थिनी दररोज शालेय व महाविद्यालयीन शिक्षणासाठी धाराशिव येथे येतात. परंतू दारफळ येथून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एकही बस येत नसल्या कारणाने सदर विद्यार्थ्यांना महाविद्यालयास येण्यासाठी व परत घरी जाण्यासाठी बस पकडणे हेतू दारफळ पाटीवर ये-जा करताना सकाळी व संध्याकाळी अशी एकूण 6 कि. मी. ची पायपीट करावी लागते.
तेंव्हा भारताचे उज्वल भविष्य असणार्या या विद्यार्थ्यांची पायपीट थांबवून त्यांचा मानसिक व शारीरिक त्रास कमी करणे हेतू नाईटआऊट येवती बस धाराशिव - सारोळा - दारफळ - दाउतपूर - इर्ला - भंडारवाडी - या मार्गे सकाळी व सायंकाळी नियोजित वेळेत सोडण्यात यावी अशा आशयाचे निवेदन आपणास यापूर्वी सादर केलेले आहे. सदरील बस सेवा तात्काळ चालू करावी अन्यथा दारफळ येथील ग्रामस्थांच्या वतीने दारफळ पाटी नजिक औसा रोड वर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.