उमरगा (संवाददाता) -उमरगा तालुक्यातील जकेकुर चौरस्ता येथील एका हॉटेलमध्ये परराज्यातील एका 22 वर्षीय तरुणीने इंस्ट्राग्रामवर लाईव्ह करुन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना निदर्शनास आली आहे. पंधरा दिवसांत चौरस्त्यावर असलेल्या लॉजवर गळफास लावून घेतलेली ही दुसरी घटना असल्याने, ही आत्महत्या की हत्या ? याचा तपास लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
येथील एका दुसरा लॉजवर कामाला असलेल्या एका 20 वर्षीय तरुणाने 5 जुलै रोजी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. तर बुधवारी (दि.19) रोजी सायंकाळी 6 वाजता एका हॉटेलमध्ये रायमत उर्फ राणी दोमन हासदा (वय 22 वर्ष) झारखंड या युवतीने इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे. याबाबत हॉटेलमधुन फोन आल्यानंतर उमरगा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. रात्री उशीरा शवविच्छेदन झाल्यानंतर तिचा मृतदेह तिच्या मुळ गावी झारखंडला पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. उमरगा ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक एस. एस. भराटे करीत आहेत. सदरची परराज्यातील युवती एका लॉजवर कशासाठी आली होती ? ती कधीपासून रहात होती ? चौरस्ता येथे पंधरा दिवसांत दुसरी घटना असल्याने तिने आत्महत्या केली का तिची हत्या झाली ? याचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.