धाराशिव (प्रतिनिधी)-येथील अक्षरवेल महिला साहित्य मंडळाच्या अध्यक्षपदी नुकतीच माजी प्राचार्या डॉ. सुलभा देशमुख यांची एकमताने निवड झाली. मंडळाने घेतलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.
धाराशिव येथे गेल्या सतरा वर्षांपासून अक्षरवेल महिला साहित्य मंडळाच्या माध्यमातून अनेक लिहित्या हाताना प्रेरणा देण्याचे काम या मंडळांमधून झालेले आहे.
या झालेल्या बैठकीमध्ये अक्षरवेलच्या प्रमुख मार्गदर्शक कमलताई नलावडे, अक्षरवेलच्या माजी अध्यक्षा डॉ. रेखा ढगे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना कमलताई नलावडे म्हणाल्या की, अक्षरवेल महिला मंडळाने कार्य फक्त शहरापुरतेच मर्यादित न ठेवता अक्षरवेलमधून घडलेल्या अनेक लेखिका, कवयित्री, कथाकार आज महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांमधून मंडळाचा नावलौकिक वाढवित आहेत. याचा सार्थ अभिमान वाटतो. याच मंडळाच्या माध्यमातून महिला कीर्तनकार म्हणून सुद्धा महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होत आहेत. डॉ. सुलभाताईंच्या कार्यकाळातही अक्षरवेल अशीच बहरेल ही अपेक्षा आहे.
यावेळी आपल्या मनोगतामध्ये डॉ. सुलभा देशमुख म्हणाल्या की, शक्य होईल तेवढा वेळ मंडळासाठी देण्याचा मी प्रयत्न करीन.आणखीन कुठले नवीन उपक्रम घेता येतील का हे सर्वांच्या सहकार्याने शक्य होईल.
यावेळी काव्यवाचनाचाही कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये उपस्थित सर्व कवयित्रींनी आपल्या काव्यरचना,गझल सादर केल्या. या अध्यक्ष निवडीच्या कार्यक्रमासाठी स्नेहलता झरकर, किरण देशमाने ,शर्मिष्ठा डांगे. डॉ. स्मिता कोल्हे, प्रा. सुनीता गुंजाळ,ज्योती कावरे, ज्योती मगर, सुमित्रा आटपळकर, डॉ. सोनाली दीक्षित, अर्चना गोरे, शिवनंदा माळी, स्वप्नाली अत्रे, पल्लवी गांधी, डॉ.बोबडे, सौ.पल्लवी शिनगारे, जयश्री फुटाणे यांची प्रमुख उपस्थिती होती. याच कार्यक्रमांमध्ये नुकतीच मराठी विषयांमध्ये सेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या प्रा. डॉ. बोबडे यांचा ही सत्कार करण्यात आला.
तसेच मंडळातील ज्या सदस्यांनी विविध ठिकाणी आपल्या साहित्याचे सादरीकरण केले त्यांचाही मंडळाच्या नवनियुक्त अध्यक्षा डॉ.सुलभा देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
