धाराशिव (प्रतिनिधी) - आरोग्यम धनसंपदा हे ब्रीद घेऊन उस्मानाबाद शहरातील अंजुमन वेल्फेअर सोसायटी शहरासह ग्रामीण भागात आरोग्य क्षेत्रात करीत आहे.
सोसायटीच्या माध्यमातून आजपर्यंत 200 गरीब व गरजू रुग्णांना उपचारासाठी 42 लाख 44 हजार रुपयांची मदत केली आहे. त्यामुळे ही सोसायटी खर्या अर्थाने रुग्णांसाठी आधारवड बनली आहे.
सोसायटीच्या माध्यमातून शहरासह ग्रामीण भागातील हिंदु-मुस्लिम व इतर सर्व समाजातील गरीब व गरजू रुग्णांना उपचारासाठी आवश्यक असलेले सर्व मार्गदर्शन केले जाते. त्यासाठी सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष फेरोज पल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्य आपापल्या परिसरात व ग्रामीण भागात गरीब गरजू अडलेल्या व नडलेल्या रुग्णांना अत्यावश्यक ती आरोग्य सुविधा व मदत मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात. विशेष म्हणजे एखाद्या रुग्णास शासकीय योजनेमध्ये बसविण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे जमा करण्यासह आर्थिक मदत पुरविण्याचे काम देखील या सोसायटीच्या माध्यमातून केले जात आहे. तर एखाद्या रुग्णाचा जवळचा नातेवाईक उपचार सुरू असताना रुग्णालयात उपस्थित नसेल तर या सोसायटीचे सदस्य स्वतःचा नातेवाईक समजून त्या रुग्णाजवळ थांबून सर्व प्रकारची सेवा करतात. तसेच अंजुमन सोसायटीच्या वतीने मागील 6 महिन्यांपूर्वी 7 रुग्णांना एक लाख 28 हजार रुपयाची सोसायटीच्या वतीने मदत करण्यात आली आहे सानिया शेख, रुकसाना शेख, सलमा शेख,अनिता कांबळे अलीम शेख, अरबाज शेख व हबीबा सय्यद हे रुग्ण किडनी व इतर गंभीर स्वरूपाच्या व्याधींनी त्रस्त होते. त्यांना या सोसायटीच्या माध्यमातून वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.तसेच एखादा रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये यासाठी विशेष दक्षता घेतली जाते. तर ग्रामीण भागातील रुग्णांना त्यांच्या घरापासून रुग्णालयात दाखल करण्यापर्यंत व रुग्णालयातून घरापर्यंत सोडण्यापर्यंतची सेवा देखील केली जात आहे.
.............................................................
माणूसकी हाच धर्म समजून रुग्णसेवा या सोसायटीच्या माध्यमातून मागील 6 वर्षापासून रुग्णांची सेवा केली जात असून यामध्ये कुठलीही जात, धर्म, आपल्या जवळचा व लांबचा असा भेदभाव न करता सर्व रुग्णांना मदतीसाठी ही सोसायटी नेहमीच धावून जात आहे. या सोसायटीचे आरोग्य सेवेचे कार्य पाहून अनेक दानशूरांनी मदत देखील केली आहे. तर अनेक छोटे-मोठे व्यापारी मदतीचा हात पुढे करतात. ती मदत सतत मिळावी यासाठी शहरात विविध ठिकाणी 100 दान पेट्या बसविण्यात आल्या आहेत.
..............................................................
सोसायटीच्या माध्यमातून अविरतपणे रुग्णांची सेवा करीत असल्यामुळे अनेक दानशूर सढळ हाताने मदत करीत आहेत. त्यामुळे या सोसायटीची न्यास कार्यालयामध्ये नोंदणी करण्यात आली आहे. सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष म्हणून फेरोज पल्ला तर सचिव म्हणून सुमय्या फिरोज पल्ला व कोषाध्यक्ष म्हणून डॉ शकील अहमद खान तसेच सदस्य म्हणून मोहसीन सय्यद, इमरान मोमीन वसीम शेख व रीजवान शेख हे काम पाहत आहेत.