धाराशिव/नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग शहरात सध्या संततधार पाऊस पडत असुन या पावसामुळे खरीपातील पिकांना मोठे जीवदान मिळणार आहे. या पावसामुळे सर्वत्र समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी एकूण 127 मिली मिटर पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात शहर व परिसरात मोठा नसला तरी समाधानकारक पाऊस पडत आहे. दि. 17, 18 व 19 जुलै रोजी दिवसभर शहर व परिसरात पावसाची रिपरिप सुरू होती. हा पाऊस पेरणी झालेल्या खरिपातील पिकांना जीवदान देणारा ठरणार आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकर्यांसह सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले होते. ज्या शेतकर्यांनी पावसाच्या भरवशावर खरिपाची पेरणी केली होती त्या शेतकर्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. उगवलेले पीक डोळ्यादेखत कोमेजुन जात असल्याचे शेतकरी पाहत होता. पावसाने दडी मारल्याने बाजारपेठाही ओस पडल्या होत्या. त्याचबरोबर शेतकर्यांच्या शेतातील ऊसाचे पीकही अक्षरशा वाळून चालले होते. त्यामुळे सध्या पावसाची नितांत गरज होती. गेल्या दोन दिवसांपासुन पडत असलेल्या पावसामुळे खरीप पिकांसह ऊसाच्या पिकाला जीवदान मिळणार आहे. या पावसामुळे शेतकरी थोडा का होईना सध्या सुखावला आहे हे मात्र नक्की.
