धाराशिव (प्रतिनिधी)- पर्जन्यछायेच्या अत्यल्प प्रमाणामुळे पर्यावरण असंतुलन वाढले आहे. भाई उद्धवराव पाटील यांचे कर्तृत्व व नेतृत्व प्रामाणिक होते. भाई उद्धवराव दादा  जास्त काळ टिकले असते तर शेतकरी व मजूर समृद्ध झाले असते किंबहुना आत्महत्या थांबल्या असत्या असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे म्हणून धाराशिव लोकसभेचे खा. ओमराजे निंबाळकर यांनी केले.

ते भाई उद्धवराव पाटील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था धाराशिवच्या वतीने येथील शहरात वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विशाल घोगरे होते. यावेळी व्यासपीठावर धाराशिव- कळंब विधानसभेचे आमदार कैलास पाटील, संस्थेचे सचिव अमरसिंह देशमुख, उपाध्यक्ष शशिकांत पडवळ, पतसंस्था निवडणूक त्रीसदस्यीय समितीचे अध्यक्ष सूर्यकांत मुंडे, संचालक बालाजी तांबे, विजयकुमार कुलकर्णी, लोककल्याण महिला पतसंस्थेचे मुख्य प्रवर्तक सौरभ मुंडे, माजी संचालक प्रा. अमोल दीक्षित आदी उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे  आ. कैलास पाटील म्हणाले की पतसंस्थेचा कारभार स्वच्छ व पारदर्शक असल्यास सभासदांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळतो. भाई  उद्धवदादांचा आदर्श ठेवून ही पतसंस्था वाटचाल करत असल्यामुळे समाजपयोगी कामे मोठ्या प्रमाणात करत आहे.भाई उद्धवराव पाटील शिक्षक पतसंस्थेचा आदर्श इतर संस्थांनी घेऊन कारभार करावा असेही आवाहन आ.पाटील यांनी केले.

धाराशिव शहरात मोठ्या प्रमाणात खा. ओमराजे निंबाळकर,आ.कैलास पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पतसंस्था सचिव अमरसिंह देशमुख यांनी तर सूत्रसंचालन संचालक बालाजी तांबे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संतोष मोरे, करण पेठे, उर्मिला भोसले, पूजा पेठे, नितीन वाळवे यांनी परिश्रम घेतले. वृक्षारोपण सोहळ्यात पतसंस्थेचे संचालक, सभासद, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी उपस्थितांचे आभार संचालक विजयकुमार कुलकर्णी यांनी मानले.


 
Top