धाराशिव -(प्रतिनिधी)-धाराशिव शहरातील भुयारी गटार योजनेचे काम सुरू असताना नगर परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना चिखलातून पायपीट करावी लागत असल्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने भर पावसात चिखलात बसून आंदोलन केल्यानंतर नगर परिषदेला जाग आली. आंदोलनाची दखल घेऊन शहरातील भुयारी गटार योजनेची कामे सुरू असलेल्या भागात तातडीने मुरूम टाकून नागरिकांची समस्या दूर करण्यात यश आल्याची माहिती शिवसेनेचे शहरप्रमुख तथा नगर परिषदेतील गटनेते सोमनाथ गुरव यांनी दिली.
धाराशिव शहरातील भुयारी गटार योजनेच्या कामासाठी रस्त्यांचे खोदकाम सुरू आहे. या कामामुळे मिल्ली कॉलनी, मुकुंदनगर, लक्ष्मीनगर, उंबरेकोठा, प्रकाशनगर, समतानगर व अन्य भागातील रस्त्यांवर निकृष्ट दर्जाचा मातीमिश्रित मुरूम टाकून जनतेच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने चिखलात बसून आंदोलन केले होते. त्यानंतर नगर परिषदेच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर कामांबाबत कार्यारंभ आदेश देण्यात येईल. तसेच शहरात सद्यस्थितीत भुयारी गटार योजनेचे काम सुरू असून प्रत्यक्ष काम झालेल्या ठिकाणी मजबुतीकरणाचे काम सुरू असून उर्वरित आवश्यक ठिकाणी भुयारी गटार योजना प्रस्तावित नाही अशा ठिकाणी नगर परिषदेमार्फत मुरूमीकरणाचे काम करण्यात येईल असे आश्वासन नगर परिषद प्रशासनाने दिले होते.
त्यानुसार समस्या निर्माण झालेल्या ठिकाणी आम्ही भेटी देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे संंबंधित रस्त्यांवर मुरूम टाकून नागरिकांची समस्या दूर केली असल्याचे सोमनाथ गुरव यांनी सांगितले. यावेळी पंकज पाटील, बाळासाहेब काकडे, नितीन शेरखाने, सुमित बागल, अमित उंबरे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.