धाराशिव (प्रतिनिधी)-शेत रस्त्यासाठी धाराशिव तहसील कार्यालयातील तहसीलदारची सही मिळवून अंतिम निकाल देण्यासाठी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक स्वाती ज्योतीराम खताळ यांनी 10 हजार रूपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर खताळ यांना संशय आल्याने लाच र्नकम घेण्यास नकार दिला. यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच मागणीची पडताळणी करून अखेर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांचे मालकीचे शेत गट क्रमांक 292 मधील क्षेत्रासाठी शेतरस्ता मिळणे कामी तहसील कार्यालय उस्मानाबाद येथे दाखल केलेल्या अर्जाचे अंतिम निकालावर तहसीलदार यांची स्वाक्षरी घेऊन निकाल देणे कामी यातील आरोपी यांनी 10,000/- रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले होते. त्यानंतर यातील आरोपी यांना संशय आल्याने त्यांनी तक्रारदार यांचेकडून लाच रक्कम घेण्यास नकार दिल्याने दि. 18 जुलै रोजी आरोपीविरुद्ध लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपाअधीक्षक सिद्राम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक विकास राठोड यांनी काम केले. त्यांच्या पथकात मधुकर जाधव, विशाल डोके, विष्णू बेळे,सचिन शेवाळे आदींनी भाग घेतला.