तुळजापूर (प्रतिनिधी)-जी 20 अंतर्गत टाटा सामाजिक विज्ञान संस्था, तुळजापूर व युनायटेड वे ऑफ इंडिया जलसंजीवनी 2.0 च्या संयुक्त विद्यमाने आर्थिक साक्षरता महिला फेडरेशन दस्त ऐवजीकरण आणि महिला नेतृत्व कौशल्य या विषयावर एक दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे उदघाटन प्रो. रमेश जारे, उप संचालक टीस तुळजापूर, व प्रमुख पाहुण्या सहाय्यक जिल्हाधिकारी प्रियमवदा म्हादळकर, प्रमुख व्याख्याते गणेश चादरे, भीमाशंकर ढाले, टीम लीडर, तांबोळी, डॉ. श्रीधर सामंत, शंकर ठाकरे, आनंद भालेराव, साखी पोकरे व महासंघातील महिला यांच्या हस्ते करण्यात आले.
उदघाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना रमेश जारे म्हणाले की, शाश्वत विकासाचे उद्देश सफल करण्यामध्ये टाटा सामाजिक विज्ञान संस्था व युनायटेड वे ऑफ इंडिया जलसंजीवनी 2.0 चे कार्य महत्वपुर्ण आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना श्री. भीमाशंकर ढाले यांनी जलसंजीवनी 2.0 अंतर्गत करण्यात आलेल्या जलसंधारण, सेंद्रीय शेती व उपजिविका कार्यक्रमाची माहिती दिली.
या प्रसंगी, प्रमुख पाहुण्या सहाय्यक जिल्हाधिकारी प्रियमवदा म्हादळकर म्हणाल्या की, स्पर्धेच्या युगामध्ये ग्रामीण भागातील मुलींना मोठ्या प्रमाणात शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची गरज असून मुलींमध्ये उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढले तर बाल विवाहाला त्यातुन आळा बसेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते श्री गणेश चादरे यांनी आर्थिक साक्षरता, महिला फेडरेशन दस्तऐवजीकरण आणि नेतृत्व कौशल्य या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तांबोळी यांनी मानले.