धाराशिव (प्रतिनिधी)-नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना विद्यापीठ अनुदान आयोग आणि केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाने सुचित केल्यानुसार धाराशिव जिल्ह्यात शैक्षणिक सुविधा वाढवण्यासाठी स्वतंत्र विद्यापीठाची आवश्यकता आहे. एक जिल्हा एक विद्यापीठ या संकल्पनेनुसार धाराशिव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्राचे पूर्ण विद्यापीठा रूपांतर करा अशी मागणी सिनेट सदस्य देविदास पाठक यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.

धाराशिव येथे असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करण्यासाठी अनेक वर्षांपासून मागणी होत आहे. विद्यापीठाच्या अधीसभा तसेच व्यवस्थापन परिषदेने एकमुखाने ठराव करून हा ठराव शासनाकडे पाठवलेला आहे. तसेच जिल्ह्यातील सर्वच आमदार, खासदारांनी शासनाकडे विनंती केलेली आहे. विधिमंडळात देखील यावर चर्चा झाली आहे. त्यामुळे शासनाने यावर भूमिका स्पष्ट करण्यासाठी डॉक्टर प्रकाश बच्छाव, सहसंचालक उच्च शिक्षण पुणे यांनी  12 मे  2022 रोजी धाराशिव येथे विद्यापीठ उपकेंद्रात येऊन लोकप्रतिनिधी आणि विविध संघटनांशी चर्चा केली आहे.

या उपकेंद्र परिसराला 60 एकर जागा असून प्रशासकीय इमारतीसह वसतीगृह आणि अनुषंगिक इमारती आहेत. या उपकेंद्रात 11 विविध विद्या शाखांचे विभाग कार्यरत आहेत. तसेच धाराशिव जिल्ह्यातली 99 वरिष्ठ महाविद्यालये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगरशी संलग्नित आहेत. शिवाय धाराशिव जिल्ह्यातील कर्नाटक लगतच्या उमरगा तालुक्यातून छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठापर्यंतचे अंतर जवळपास दोनशे ते अडीचशे किलोमीटर आहे. यावेळी सिनेट सदस्य नाना गोडबोले हेही उपस्थित होते.


 
Top