धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 2023-24 या शैक्षणिक वर्षातील ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. बेसिक कॉस्मॉटॉलॉजी, ड्रेस मेकिंग, कॉम्प्युटर ऑपरेटर ऍन्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट, डेस्कटॉप पब्लीशिंग ऑपरेटर फ्रुट ऍन्ड व्हेजिटेबल प्रोसेसिंग, सेक्रेटरियल प्रॅक्टीस, मेसन, वेल्डर, कारपेंटर, इलेक्ट्रीशिअन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, फिटर, मशिनिस्ट, पेंटर, टुल ऍन्ड डाय मेकर, टर्नर, वायरमन, रेफ्रिजिरेशन ऍन्ड एअरकंडीशन टेक्नीशिअन, मोटार मेकॅनिकल व्हेईकल या व्यवसायासाच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेण्याची अंतिम मुदत 11 जुलै असून 13 जुलै 2023 रोजी प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिध्द होणार आहे. दि.13 आणि 14 जुलै रोजी गुणवत्ता यादीबाबत हरकती नोंदविण्यात येतील. दि.16 जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात येईल. दि.20 जुलै रोजी पहिल्या प्रवेश फेरीसाठी संस्था, व्यवसायनिहाय निवड यादी प्रसिध्द करण्यात येईल. दि.21 ते 25 जुलै रोजी यादीतील विद्यार्थ्यांची कागदपत्रे पडताळणी व प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
या सर्व व्यवसाय प्रशिक्षणास प्रवेश घेण्यासाठी www.admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी. त्यानंतर आवश्यक दस्ताऐवजासह घेण्याकरिता उमेदवारांनी नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जावून कन्फरमेशन करणे आवश्यक आहे. कन्फरमेशन झाल्यानंतर संबंधित उमेदवार विकल्प सादर करण्याकरिता पात्र होईल. काही अडचण आल्यास उपरोक्त संकेतस्थळावर देण्यात आलेल्या व्हिडीओचा आधार घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य प्रवीण औताडे यांनी केले आहे.