धाराशिव (प्रतिनिधी) - ढोकी व चार गावे पाणीपुरवठा योजना थकीत वीज बिल व दुरुस्ती अभावी अनेक वर्षापासून बंद असून याबाबत आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी आज जिल्हा परिषदेमध्ये घेतलेल्या बैठकीत महावितरण संबंधित सर्व विषय मार्गी लावले. तसेच या चारही गावांना परिपूर्ण पाणी पुरवठा करण्यासाठी नवीन तांत्रिक सल्लागार नेमून 15 दिवसात तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यता अहवाल सादर करण्यासह वीज बिलाचा भार शून्य करण्याच्या अनुषंगाने पर्याप्त सौर उर्जा प्रकल्पासाठी वाढीव निधीची शासनाकडे मागणी करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिल्या.
या योजने अंतर्गत चारही गावांमध्ये अंतर्गत पाईपलाईनची आवश्यकता असून येडशी व तडवळा गावची चोराखळी धरणातून स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्याची मागणी आहे. येडशी मध्ये संपूर्ण पाईपलाईन नव्याने करण्याची गरज बैठकीत व्यक्त करण्यात आली, तर इतर गावांमध्ये 20 ते 40 टक्के वितरण व्यवस्था नव्याने करून नळ जोडणीची आवश्यकता आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे मुख्य अभियंता लोलापोड यांच्याशी दूरध्वनी द्वारे संवाद साधून या दोन्ही बाबींच्या अनुषंगाने तांत्रिक व आर्थिक दृष्ट्या व्यवहार्यता तपासण्यासाठी नव्याने सल्लागार नेमण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. तसेच योजनेचे वीज बिल शून्यावर आणण्यासाठी आवश्यक क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी सध्या एक कोटी नऊ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध असून यामध्ये केवळ 150 ते 160 कि. वॅट क्षमतेचाच प्रकल्प उभारणे शक्य आहे. मात्र योजनेची गरज लक्षात घेता किमान 250 कि. वॅट क्षमतेच्या प्रकल्पाची आवश्यकता असल्याने वाढीव निधीची शासनाकडे मागणी करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.
भाजपा - शिवसेना सरकारने 30 जून 2022 पर्यंतचे वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे या योजनेचे रु. 2.45 कोटी एवढे वीज बिल माफ होत आहे. 1 जुलै पासून 31 मार्च 2023 पर्यंतच्या थकीत वीज बिलाची 50 % रक्कम जिल्हा परिषद स्वनिधीतून भरण्यात येणार असून उर्वरित 50 % रक्कम या चारही गावांकडून समप्रमाणात जमा करून घेण्यात येणार आहे. योजनेवर बल्क फ्लो मीटर बसविण्यात आलेले असून योजना कार्यान्वित केल्यानंतर सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम पूर्ण होईपर्यंत पुढील वीज बिलाची आकारणी संबंधित ग्रामपंचायतीने केलेल्या पाणी वापरा प्रमाणे करण्यात येणार आहे.
सदरील बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, माजी जि.प. अध्यक्ष नेताजी पाटील, जि.प. अध्यक्ष अस्मिता कांबळे, तेरचे उपसरपंच श्रीमंत फंड, डॉ. प्रशांत पवार, महावितरणचे प्र. अधीक्षक अभियंता श्री राजेश गुजर, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता श्री संतोष देशपांडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उप अभियंता श्री. रमेश ढवळे यांच्यासह तेर, ढोकी व तडवळ्याचे ग्रामसेवक उपस्थित होते.