धाराशिव (प्रतिनिधी) - धाराशिव जिल्ह्यातील भुम,परंडा वाशी या मतदारसंघात मारहाण, धमकावणे असे प्रकार वाढले असुन गुंडाराज सुरु झाले आहे. पवनचक्की चालकांना मारहाण करुन खंडणी उकळने, बाजार समिती संचालक यांना बंदुकीचा धाक दाखवून अपहरण व मारहाण यासारख्या घटना घडत असुन स्थानिकासह मुंबई पुणे येथील टोळ्यांची दहशत वाढली आहे. या सर्व प्रकाराला पालकमंत्री यांचे पाठबळ असुन पोलिसांत गुन्हा नोंद करताना त्यांचा दबाव असतो अशी टीका केली.
पालकमंत्री यांच्या राजीनामाची मागणी माजी आमदार राहुल मोटे यांनी करीत या सर्व गुंडाराज बाबतीत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचे सांगितले. उद्या फडणवीस यांची धाराशिव येथे वेळ मागितली असुन ते देतील अशी अपेक्षा व्यक्त केली. या सर्व घटनावर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचे लक्ष असुन अधिवेशनात याचे पडसाद दिसून येतील असे मोटे म्हणाले तसेच कारवाई व प्रतिबंध न झाल्यास लवकरच महाविकास आघाडीची ठोस भुमिका घेऊ असे सांगितले.
महाविकास आघाडीच्या भुम परंडा येथील नेत्यांनी शिंगोली विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली त्यावेळी माजी आमदार राहुल मोटे, शिवसेनेचे रणजित पाटील, मेघराज पाटील, परंडा बाजार समितीचे संचालक जैन, अॅड. देवकते, बुद्धिवान लटके यासह पदाधिकारी उपस्थितीत होते.भाजपाचे सुजितसिंह ठाकुर .ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील व आम्ही राजकीय विरोधक असतानाही गेल्या 25 वर्षात गुंडागर्दी केली नाही किंवा तसे झाले नाही मात्र आताची स्तिथी चिंताजनक असल्याचे मोटे व रणजित पाटील यांनी सांगितले. महाविकास आघाडीच्या पुर्वनियोजित पत्रकार परिषदेला धाराशिव जिल्हा पातळीवरील नेते मात्र उपस्थितीत नव्हते.