धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील इनामी जमिनी वर्ग एकमध्ये कायम ठेवाव्यात, मदत मास, खिदमत मास, सिलींग जमीन व महार वतन वर्ग 1 मध्ये कायम ठेवावे, जमिनी खालसा करुन द्याव्यात, नजराणा व दंडाची आकारणी रद्द करावी व इतर मागण्यांसाठी जिल्हा शेतकरी बचाव समितीच्या वतीने श्रीक्षेत्र तुळजापूर येथे 16 जून रोजी सकाळी 11.00 वाजता जागरण गोंधळ आंदोलन करण्यात येणार आहे. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील दखल न घेतल्यामुळे आता सरकारला सद्बुद्धी मिळावी म्हणून कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या दरबारात हे आंदोलन करणार असल्याचे समितीचे अध्यक्ष धनंजय शिंगाडे यांनी सांगितले.
सोमवारी जिल्हा शेतकरी बचाव समितीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिल्हाधिकार्यांमार्फत निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनात म्हटले की, नीति आयोगाच्या अहवालानुसार धाराशिव जिल्हा हा देशातील तिसर्या क्रमांकाचा आकांक्षित जिल्हा असून महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. अशा स्थितीत तत्कालीन जिल्हाधिकारी दिवेगावकर व तहसिलदार गणेश माळी यांनी 80 टक्के जमिनी वर्ग 1 वरुन वर्ग 2 मध्ये आणल्या आहेत. या निर्णयामुळे शेतकर्यांच्या आत्महत्या आणखी वाढू शकतात. गेल्या 60 वर्षापासून जास्त कालावधी उलटून गेल्यावर सातबारामध्ये वर्ग 1 ऐवजी वर्ग 2 अशी नोंद घेण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे संबंधित शेतकर्यांना, प्लॉटधारकांना एनए ले-आऊट झालेल्या जमिनीबाबत लेखी स्वरुपात पूर्वसूचना देण्यात आलेली नाही. तसेच कोणत्याही प्रकारची सुनावणी अथवा म्हणणे ऐकून घेण्यात आलेले नाही.
मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि महसूल प्रशासनाला शेतकरी व प्लॉटधारकांच्या समस्या दूर करण्याची सद्बुद्धी मिळो यासाठी जिल्हा शेतकरी बचाव समितीच्या वतीने शुक्रवार, दि. 16 जून 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता श्रीक्षेत्र तुळजापूर येथे तुळजाभवानी मंदिरासमोर जागरण गोंधळ आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी जिल्हा शेतकरी बचाव समितीचे अध्यक्ष धनंजय शिंगाडे, सुभाष पवार पाटील, सल्लागार महादेव लिंगे, माजी उपनगराध्यक्ष राजाभाऊ बागल, आनंद जगदाळे, अर्जुन पवार, राहुल गवळी, फेरोज पल्ला, पवन पवार, भारत नाईकनवरे, अर्जुन जाधव, मनोज राजेनिंबाळकर, रणधीर देशमुख, बाबासाहेब अंधारे, सौ.शीला उंबरे-पेंढारकर, अॅड. बयाजी साबणे यांच्यासह शेतकरी, प्लॉटधारक उपस्थित होते.