धाराशिव / प्रतिनिधी-

 कर्नाटका मध्ये काँग्रेसला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. काँग्रेसची सत्ता आली हे यश म्हणजे राहुल गांधी यांच्या सर्व जातीधर्म एकत्र रहावे, जातीयवाद कमी व्हावा, लोकशाही जीवंत रहावी. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेप्रमाणे देश चलावा, यासाठी काढलेल्या पदयात्रेचे यश आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष विश्वास शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. 

कर्नाटकामध्ये काँग्रेस पक्षाला भरभरून यश मिळाल्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीने धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक व डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात विजय उत्सव शनिवारी साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी देशात कोणत्याही पक्षाशी दडपशाही चालू शकत नाही हे कर्नाटकाच्या निकालाने दाखवून दिले आहे. भाजपने चालवलेल्या दडपशाहीमुळेच लोकांनी त्यांना त्याची जागा दाखवली आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. तर ठाकरे गटाचे शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांनी कोणत्याही पक्षाचा उन्माद लोक सहन करीत नाहीत. घटनेने दिलेल्या अिधकाराचा वापर करत लोक निवडणुकीत त्यांना रोखतात,अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. 

महाविकास आघाडीचा आंनदोत्सव साजरा करण्यासाठी प्रशांत पाटील, प्रभाकर लोंढे, अॅड. राज कुलकर्णी, उस्मान कुरेशी, अग्निवेश शिंदे, सिध्दार्थ बनसोडे, सोमनाथ गुरव, शिला उंबरे , सचिन तावडे, डाॅ.अस्मिता शहापूरकर, बाळासाहेब काकडे, हनमंत पवार, शेखर घोडके, अॅड. जावेद काझी, पंकज पाटील, उमेश राजे निंबाळकर, अॅड. राहुल लोखंडे, वाजेद पठाण  आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 
Top