धाराशिव / प्रतिनिधी- 

समाजात एकोपा, सद्भावना निर्माण करण्यासाठी केवळ प्रार्थना करून चालणार नाही, तर निरंतर प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत डॉ. सय्यद रफिक पारनेरकर यांनी व्यक्त केले.

जमाते-इस्लामी-हिन्दच्या धाराशिव शाखेच्या वतीने ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास आमदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, जनता बँकेचे संचालक आशिष मोदाणी, प्रशांत पाटील, मसूद शेख, जावेद काझी, अग्निवेश शिंदे, पंकज पाटील, नाना घाडगे, अभिजित देशमुख, आबा इंगळे, रणवीर इंगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना डॉ. पारनेरकर म्हणाले की, चांगले पीक घेण्यासाठी केवळ पेरणी करून भागत नाही. त्याची मशागत वेळोवेळी केली तरच उत्तम पिकाची आपण आशा करु शकतो. आपसातील द्वेष, मत्सर, घृणा बाजूला सारुन प्रेम, सद्भावना, बंधुभाव निर्माण व्हावा यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. रमजानच्या रोज्यांचा (उपवास) मूळ उद्देश हाच आहे की, आपण ईश्वरासमक्ष आहोत. आपल्या प्रत्येक कर्माचा तो न्यायनिवाड्याच्या दिवशी म्हणजेच कयामतच्या दिवशी हिशोब घेणार आहे. चांगल्या कर्माचा मोबदला स्वर्ग रूपाने व वाईट कर्माचा मोबदला नर्क रुपाने तो देईल ही भावना जागृत ठेवून आपण जीवन जगले पाहिजे.संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, संत तुकडोजी महाराज यांच्या अभंगाचे दाखले देऊन ते म्हणाले की, संतांची शिकवण ही कुराणच्या शिकवणीशी सुसंगत होती.  कार्यक्रमात आमदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.  प्रास्ताविक शेख सजीयोद्दीन यांनी केले. तर आभार साहेबलाल तांबोळी यांनी व्यक्त केले.


 
Top