हलर्गीपणाच्या कामामुळे अधिकारी-कर्मचारी धारेवर 
धाराशिव / प्रतिनिधी- 

ठिबक सिंचन, तुषार सिंचन व अन्य सर्व प्रलंबित प्रस्ताव 7 दिवसाच्या आत मंजूर करावेत, अशा सूचना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी बैठकीत अिधकाऱ्यांना दिल्या.   नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या अंतर्गत विविध योजनेचा आढावा खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी घेतला सदर आढावा बैठक ही जिल्हा नियोजन विभागाच्या सभाग्रहात पार पडली. यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणाच्या कामामुळे बैठकीत त्यांना धारेवरही धरण्यात आले. 

धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यामध्ये या योजनेअंतर्गत विविध कामांना शासनामार्फत 100% ते 65% पर्यंत अनुदान उपलब्ध करून दिले जाते. ही योजना शेतकऱ्याच्या हिताची असून यामुळे शेतकऱ्यांना थेट लाभ होतो.सिंचनाकरिता अनुदान तत्वावर पी.व्ही.सी. पाईप, ठिबक सिंचन संच, तुषार सिंचन तसेच मिनी स्प्रिंकलर संच विद्युत पंप, पॉली हाऊस, फळबाग लागवड, शेतीचे यांत्रीकीकरण तसेच शेतीउपयोगी अवजारे आदि करिता अनुदान उपलब्ध करून देण्यात येते. मागील एक महिन्यापासून स्वतः खासदार साहेबांनी पाठपुरावा करत सुमारे 3000 प्रस्ताव निकाली काढून शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा झाले. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आज रोजी कामे पूर्ण करून अनुदानाच्या प्रतीक्षेत 3727 इतके प्रस्ताव आहेत आणि  त्यापैकी ठिबक सिंचन व तुषार सिंचनाचे 3129 व इतर प्रस्ताव 598 एवढे प्रलंबित प्रस्ताव आहेत. कृषी विभागातील अधिकऱ्यांच्या दप्तर दिरंगाईमुळे सदर प्रस्ताव वेगवेगळ्या डेस्क वरती 5977 प्रस्ताव मंजूरीच्या प्रतिक्षेत असून अद्याप कामे पूर्ण न केल्या कारणाने शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही. माहे डिसेंबर 2022 ते माहे 31 मार्च पर्यंतचे अनेक प्रकरणे वेगवेगळ्या डेस्क वरती प्रलंबित आहेत.  ही बाब खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या लक्षात आल्यानंतर नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या आढावा बैठक घेवून संबंधित अधिकाऱ्यांना सर्व प्रकरणे 7 दिवसाच्या आत तात्काळ निकाली काढण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सुचना करण्यात आल्या तसेच कोणताही पात्र शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार नाही याचे खबरदारी घेण्याबाबत सुचना केली आहे.

 त्याचबरोबर  कृषी मंत्री   यांनाही 9704 शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रस्ताव संदर्भात निधी उपलब्ध करून देण्यासाठी विनंती करणार असल्याचे सांगितले आहे. सदर बैठकीस जिल्हा कृषी अधिक्षक माने साहेब, कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


 
Top