मुरुममध्ये काॅग्रेसची १ जागा बिनविरोध 

उमरगा/ प्रतिनिधी-

उमरगा व मुरुम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडत बिनविरोधची बैठक फिस्कटली. उमरगा बाजार समितीच्या निवडणुकीत १८ जागेसाठी ३८ उमेदवार तर मुरुम बाजार समितीच्या १७ जागेसाठी ४२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मुरुम ग्रामपंचायत मतदार संघातील अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव असलेल्या जागेसाठी काॅग्रेसचा एकमेव अर्ज असल्याने ते बिनविरोध निवड होईल. उमरगा बाजार समितीसाठी महायुती विरोधात युतीचा सामना रंगणार आहे. तर मुरुम बाजार समितीमध्ये मात्र काॅग्रेस व (शिवसेना ठाकरे) गटासमोर भाजपा व शिवसेना (शिंदे गट) हे दोन पॅनलमध्ये सामना रंगणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने आर्ध्या जागेवर उमेदवार उभे केले आहेत. 

उमरगा व मुरुम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. मागील निवडणुकीत काॅग्रेस भाजपाची युती तर राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेसोबत युती केली होती. यावेळी दोन्ही बाजार समितीच्या निवडणुका बिनविरोध काढण्यासाठी दोन दिवस बैठकांचे फड रंगले. बुधवारी दुपारी दोननंतर शेवटच्या क्षणी बैठक फिस्कटली. उमरगा बाजार समितीच्या सोसायटी मतदारसंघातील ११ जागेसाठी २३ उमेदवार, ग्रामपंचायत मतदारसंघातील ४ जागेसाठी ८  उमेदवार, व्यापारी मतदारसंघांत २ जागेसाठी ५ उमेदवार तर हमाल मापाडी मतदारसंघातील १ जागेसाठी २ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. तर मुरुम बाजार समितीच्या निवडणुकीत १८ जागेसाठी ५७ अर्ज दाखल झाले होते. दरम्यान आज उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १५ उमेदवारांनी माघार घेतली आहे. अनुसूचित जाती जमाती मतदार संघातील एका जागेवर काॅग्रेसचा एकमेव उमेदवार असल्याने तो बिनविरोध होणार आहे. तर उर्वरित १७ जागेसाठी ४२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मतदार संघातील ११ जागेसाठी २८ उमेदवार रिंगणात आहेत. ग्रामपंचायत मतदार संघातील ४ जागेपैकी अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव असलेली १ जागा बिनविरोध निघाली असून उर्वरित ३ जागेसाठी ८ उमेदवार रिंगणात आहेत. व्यापारी मतदार संघातील २ जागेसाठी ४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर हमाल मापाडी मतदार संघातील एका जागेसाठी २ उमेदवार निवडून रिंगणात आहेत. व्यापारी व हमाल मापाडी मतदारसंघात एकास एक सरळ लढत होत आहे. अंतिम यादी आज प्रसिद्ध होणार आहे. २८ एप्रिल रोजी मतदान तर २९ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. राज्यातील सत्तांतरानंतर आलेली पहिलीच मोठी निवडणूक असल्याने यावेळी काॅंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील, माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड, शिवसेनेचे उपनेते आ. ज्ञानराज चौगुले, जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापुराव पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरण पाटील, शिवसेनेचे युवानेते किरण गायकवाड, भाजपाचे नेते तथा जिपचे माजी सभापती ॲड. अभयराजे चालुक्य, ठाकरे गटाचे बाबा पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष कैलास शिंदे यांचा उमेदवार ठरवताना व निवडणुक प्रचारात कस लागणार आहे.


 
Top