तुळजापूर  / प्रतिनिधी- 

 तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथील पंपग्रहाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असुन ठेकेदाराचा मनमानी कारभार सुरु आहे. येथील सिमेंटबांधकामात मातीमिश्रित खडी व डस्टचा वापर केला जात असुन संबंधित विभागातील अधिकाऱ्यांचे याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे.

 तुळजापूर तालुक्यातील पांगरदवाडी येथे कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजने अंतर्गत (टप्पा क्रमांक 4) पंपगृहाचे काम सुरु आहे. या पंपग्रहाचे काम अंदाजपत्रकानुसार न करता संबंधित ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करत आहे. सिमेंट बांधकामामध्ये माती मिश्रित खडी व डस्ट चा वापर केला जात असून या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मराठवाड्याचे हक्काचे 21 टिएमसी पाणी उजनी धरणातुन मराठवाड्यात आणन्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सन 2008 साली या योजनेची घोषणा केली होती. 2010 साली या कामाची सुरवात करण्यात आली होती. पांगरदरवाडी सिंचन तलावाचे काम जवळपास पुर्णत्वाकडे गेले असुन पंपगृहाचे खोदकाम करुन बांधकाम युध्दपातळीवर सुरु आहे. पंपगृहाचा आकार 17 मीटर बाय 21 मिटर असुन या पंपावर 2460 अश्‍वशक्तीचे तीन पंप बसवण्यात येणार आहेत. पांगरदरवाडी सिंचन तलावातुन कालव्याने तुळजापूर येथील रामदरा तलावात पाणी सोडण्यात येणार आहे. मराठवाड्याच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून या प्रकल्पामुळे मराठवाड्यासह तालुक्यातील सिंचन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे. शासन या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी करोडो रुपये खर्च करत आहे. मात्र, शासनाच्या उद्देशाला ठेकेदार हरताळ फासत असून केवळ मलिदा लाटण्यासाठी ठेकेदार कामाची मलमपट्टी करत आहे. संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन ठेकेदारावर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत.

 
Top